*हिंसक विचार थांबविण्यासाठी विचार प्रक्रिया बदलावी लागेल :- ऍड यशोमतीताई ठाकूर*

0
572
Google search engine
Google search engine

_एक दीर्घ श्वास प्रबोधन व्हिडिओचे प्रकाशन_

अमरावती :-
हिंसक विचार थांबवायचा असेल तर लाइफस्टाइल आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे. कुणाला एक थप्पड मारली तर काय होते हा अविचार इतरांचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्याची आपली जबाबदारी विसरायला लावणारी प्रक्रिया सुरू करतो त्यामुळे राग न येणे ही महत्वाची पायरी मानली तर स्त्री-पुरुष सहजीवन व चांगले कौटूंबिक वातावरण आपण निर्माण करू शकतो असे मत महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले

सहयोग ट्रस्ट आणि मायग्रोथ झोन द्वारे जनहितासाठी तयार केलेल्या एक दीर्घ श्वास या प्रबोधन व्हिडिओचे झूम अँप द्वारे प्रकाशन करतांना त्या आज बोलत होत्या. व्हिडिओ च्या प्रभावी माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार विरोधी संदेश खूप परिणामकारक पद्धतीने समाजातील सर्व स्तरात पोहोचेल असे सुद्धा ऍड यशोमती ठाकूर म्हणाल्या.
या ऑनलाइन कार्यक्रमात संविधान तज्ञ ऍड असीम सरोदे, सागर विश्वास, सामाजिक न्याय विश्लेषक ऍड रमा सरोदे, ऍड स्मिता सिंगलकर (उच्च न्यायालय नागपूर) , महाराष्ट्राचे महिला बाल कल्याण आयुक्त हृषीकेश यशोद आणि महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी सहभागी झाले होते.
सहयोग ट्रस्टच्या सचिव ऍड रमा सरोदे म्हणाल्या की, कोरोना काळात महिलांवरील हिंसा जगभरात वाढल्याचे पुढे आले. महिलांसाठी अनेक हेल्पलाईन आहेत व अनेक सुरू झाल्यात पण त्याचवेळी साधारणतः 57 % स्त्रियांना फोनचा एक्ससेस नाही असे लक्षात आले. ज्यांच्या जवळ आधुनिक फोन आहेत आणि ज्यांच्याकडून हिंसा होऊ शकते त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा प्रभावी उपाय ठरू शकतो. एक दीर्घ श्वास हा राग आणि तणाव कसा दूर करता येईल यावरील मार्ग सांगणारा प्रबोधन व्हिडिओ आहे. हिंसा होण्यापूर्वीच ती थांबवून कुटुंबातील व समाजातील वातावरण चांगले करता येईल असा विश्वास आम्ही प्रस्थापित करू इच्छितो.
मायग्रोथ झोनचे सागर विश्वास म्हणाले की, अनेकदा आपल्याला राग येतो आणि राग आला की आपला प्रतिसाद हिंसक स्वरूपाचा होतो. काही छोट्या छोट्या गोष्टी तंत्र म्हणून वापरून आपण आपल्या सवयी बदलू शकतो, आपला प्रतिसाद कसा असेल ते आपण निवडू शकतो. आपल्या वागण्याचा पॅटर्न बदलायचा आहे असे ठरवून आपल्या वागणुकीवर लक्ष ठेवले तर केवळ कुटुंबात नाही तर नोकरीच्या, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आपण बदल घडाऊन आणू शकतो.
कुटुंबांतर्गत हिंसा थांबली तरच स्वस्थ आणि निरोगी समाज निर्माण होईल या भावनेतून या व्हिडिओ मध्ये अनेक रंगकर्मी व कलाकार दिलीप प्रभावळकर, रोहिणी हत्तगडी, गिरीश कुलकर्णी, प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी, राधिका आपटे, प्रतीक्षा लोणकर, मधुराणी गोखले प्रभुलकर, विभावरी देशपांडे, किशोर कदम, मुक्ता बर्वे, जयवंत वाडकर, सोनाली कुलकर्णी ज्युनिअर, श्रुती मराठे, उमेश कामत, प्रिया बापट, अमृता खानविलकर, विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, क्षिती जोग, किरण यज्ञन्योपवित, अनिता दाते-केळकर, हृषीकेश जोशी, समीर पाटील, स्पृहा जोशी, सायली संजीव, प्रसाद ओक सहभागी झाल्याने हिंसेविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचतो अशी भावना व्यक्त करण्यात आली. अनेक व्हिडिओ मधून हिंसा थांबविण्यासाठी काय करू नये हे सांगितले जाते पण काय सकारात्मक कृती करून हिंसा थांबविता येते असा विचार या प्रबोधन व्हिडिओतून पुढे येतो असे सांगून ऍड स्मिता सरोदे- सिंगलकर यांनी सर्वांचे आभार मानले.