अकोट तालुक्यात वादळी तांडव

0
913

आकोटः संतोष विणके

 

गारपीट वादळी वाऱ्याने फळ बागायतदारांचे अतोनात नुकसान

रविवारी संध्याकाळी ६ वा. सुमारास तालुक्यात तुफान पाऊस गारपीट व सोसाट्याच्या वादळी तांडवाने दाणादाण उडवली. या वादळी पाऊस गारपीटने सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांवर अस्मानी संकट कोसळले आहे. काल ढगांच्या गडगडाटात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तालुक्यातील अकोलखेड,पणज,अंबोडा,पोपटखेड अकोली जहागीर आदी सर्कलमधील फळबाग व भाजीपाला उत्पादकांना जोरदार फटका बसला

. या परिसरातील गावांमध्ये लिंबू पेक्षा मोठ्या आकाराच्या गारा पडल्या गारा व वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा ,केळी पपई, लिंबू,कांदा, भुईमूग टरबूज, खरबूज व इतर भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्याने अनेकांच्या शेतातील फळझाड ही उन्मळून पडलीत.कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक संकटाला तोंड देत असताना फळ बागायतदारांवर आलेल्या या वादळी तांडवाने नेस्तनाबूत होण्याची पाळी आली आहे. या वादळी तांडवाने सर्वाधिक नुकसान अकोलखेड व पणज,अकोली जहाॕ. याभागात झाले असून यात फणसाची मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत.

गेल्या दोन दिवसापासून पाऊस ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस येणार असा अंदाज असतानाच वादळी सोसाट्याचा वाऱ्याने फळबागांची पुरती दाणादाण झाली आहे. मात्र अचानक एवढ्या तीव्रतेचा वादळी तांडवाने अकोट तालुका झोडपून निघेल असे वाटले नव्हते.

या वादळी तांडवातील संकटग्रस्त शेतकर्‍यांनी आमदार व महसुल प्रशासनाला निवेदने देत नुकसानीचा सर्वे व पंचनामा करून पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी साकडे घातले आहे.

बाधित क्षेत्रातील पीक नुकसानीचा सर्वेः तहसीलदार राजेश गुरव

तालुक्यातील 3651 हेक्टर पैकी 1430 हेक्टर क्षेत्रातील संत्रा, नींबू,केळी, कांदा व इतर भाजीपाला पीक काल झालेल्या गारपीट वादळी तांडवाने बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाधित क्षेत्रातील नुकसानीचा सर्वे करण्यात येणार आहे