लॉकडाऊनवर मात करत रसवंतीच्या उसातुन केली गुळ निर्मिती

0
2535

युवा शेतकऱ्याची टाळेबंदीवर जिद्दीतुन मात

आकोटः संतोष विणके

करोनाच्या जागतिक महामारीत सर्वच उद्योग व्यावसाय ठप्प झाले असून कष्टकरी शेतकरी ही यात भरडल्या गेला. निसर्गाचा लहरीपणा अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत उभं केलेलं पीक करोना च्या महामारीमुळे हाती सापडलं.
परंतु काही शेतकरी याही परिस्थितीत जिद्द, चिकाटी व परिश्रमाची पराकाष्टा करत यावर मार्ग काढत आहेत.
आकोट येथील भूमिपुत्र श्याम बोरोकार यांनी 3 एक्कर रसवंतीसाठी ऊस लागवड केली होती.

यावर्षी रसवंतीचा हंगाम सुरू होता बरोबरच करोनाचा प्रवेश भारतात झाला.
पहिल्या जनता कर्फ्यु नंतर पुढे लॉकडाऊन वाढत गेले ते आजतागायत आहे.
रसवंतीचा ऊस आता कामी येणार नाही व शेतात तसाच उभा आहे. हे या तरुण शेतकऱ्याला स्वस्थ बसू देत नव्हते. परिणामी प्रयत्नांची पराकाष्ठा करत श्याम बोरोकार या युवा शेतकऱ्यांने शेतातील उसाचे गाळप करून गूळ तयार करण्याचा निश्चय करून गुळाची निर्मिती सुरू केली.

या संकटकाळात ईतर कुठलाही अधिकचा रासायनिक प्रक्रिया खर्च न करता सरळ जुन्या पारंपारिक पद्धतीचा अवलंब करत काटसावर,भेंडीच्या झाडाची साल, गायीचे दूध, जायफळ, विलायची याचा उपयोग करीत सेंद्रीय गुळाची निर्मिती केली. यातून नैसर्गिक शुद्ध, मधुर व सात्विक गुळाची निर्मिती झाली.

गुळाची चव स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने त्याची मागणी वाढली आहे.
उसाच्या गाळपातून 50 क्विंटल पर्यंत गुळाचे उत्पादन झाले असून खर्च वजा जाता यातून त्यांना 3 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.
करोनाच्या महामारीमुळे शेती व शेतकऱ्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्यात व पुढेही निर्माण होणार आहेत.
शेतजमिनीच्या विभाजनाने उत्पादनाच्या मार्यदा आल्या आहेत. उत्पादन आणि उत्पन्न यातील ताळमेळ ठेवत शेती करणे हे सध्याच्या काळात आव्हान आहे.
गरज आहे ती जिद्द,चिकाटी व अतिरिक्त परिश्रम करण्याची व आपली शेत-माती व प्रपंच आत्मनिर्भर करण्याची.

शेतातील कच्च्या मालावर स्वतः च शेतकऱ्यांनी प्रक्रिया करावी आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग करून थेट शेतकरी ते ग्राहक असे मार्केटिंग स्वतःच करावे. व आपले उत्पन्न वाढवावे.
श्याम माणिकराव बोरोकार