देशी दारू दुकानातील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक २ दिवसांचा पीसीआर

0
393

ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय मुपडे यांची कारवाई

चांदूर रेल्वे –

चांदूर रेल्वे शहरातील देशी दारू दुकानातील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर केले असता २ दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात पीएसआय मुपडे यांनी केली.

सविस्तर वृत्तानुसार, चांदूर रेल्वे शहरातील एसटी डेपोजवळ असलेल्या मुरलीधर शेषराव सराड यांच्या मालकीचे देशी दारू दुकान चोरट्यांनी २४ मे ला रात्री फोडून देशी दारूचे १० बॉक्स (१००० नग) अंदाजे किंमत २३ हजार रूपये व १ डीवीआर बॉक्स किंमत ४ हजार असा एकुण २७ हजारांचा माल लंपास केला होता. याप्रकरणी २५ मे ला मुरलीधर सराड यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर चांदूर रेल्वे पोलीसांनी तपास चक्रे वेगाने फिरवीत मंगळवारी (ता. २६ मे) संशयावरून सागर राजरतन पवार (३३) रा. मॉ जिजाऊ नगर, बस स्टँड मागे, चांदूर रेल्वे याला ताब्यात घेतले होते. यानंतर सदर आरोपीच्या घरची झळती घेतली असता घरात २७३ नग देशी दारू किंमत ७ हजार ९८ रूपये मिळून आली. त्यानंतर आरोपीला अटक करीत त्याच्याविरूध्द कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरूवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील कारवाईमध्ये ठाणेदार दीपक वानखडे, पीएसआय गणेश मुपडे, एएसआय संजय राठोड, पो. कॉ. संतोष राठोड, शरद खेडकर, आशिष राऊत यांचा समावेश होता.