कडेगाव तालुक्यात रस्ते दुरूस्तीची कामे गतीने : सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियोजनबध्द् कार्यक्रम : रस्ते दुरूस्ती झाल्याने प्रवाशी वर्गातून कामाचे कौतुक

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगाव

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पावसाळ्या पुर्वी रस्त्यांची देखभाल दुरूस्तीची कामे गतीने सुरू आहेत. धोकादायक झाडांच्या फांदी तोडणे, ओढ्यावरील मोरी स्वच्छ करणे, रस्त्यावर वरील पुलावरती साचणारे पाणी काढून देणे अशा प्रकारची कामे सुरू आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे मुजविण्याबरोबर पावसाळा पुर्व कामे सुरू केल्याने प्रवाशी वर्गातून बांधकाम विभागाच्या कामाचे कौतुक होत आहे.
तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जादा पावूस झाला. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच अनेक रस्त्यांचा भराव खचला. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
हवामान खात्याने चालू वर्षीही मोठ्या पावसाची शक्यता वर्तावली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील रस्त्यांचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा पुर्व रस्ते दुरूस्तीची कामे सुरु केली आहेत. पुसेसावळी-कडेपूर- वांगी रस्ता, शाळगाव-कडेगाव-तडसर रस्ता, कोतवडे-सोहोली-तोंडोली रस्ता, रामापूर-देवराष्ट्रे रस्ता, कडेगाव-तडसर-चिंचणी-मोहिते वडगाव रस्ता, उपाळे-तोंडोली रस्ता, मल्हारपेठ-पंढरपूर रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यावरील पुलावर साचणारे पाणी काढणे, मोरी स्वच्छ करणे, खड्डे मुजवणे, रस्त्याकडील धोकादायक झाडांच्या फांदी तोडणे तसेच रस्त्याकडील गटर काढून साचणारे पाणी प्रवाहीत करणे आदी कामे सुरू केली आहेत.
गेल्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील प्रमुख राज्य आणि जिल्हा मार्गावरील रस्त्यावर वाहतुक वेग मर्यादा, धोकादायक वळण मार्ग असे दिशादर्शक फलक लावले आहेत. तसेच स्पिडब्रेकरसाठी पट्टे मारले आहेत. रस्त्याकडील साईडपट्टी मजबूतीकरण करणे ही कामे झाली आहेत. या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित झाल्याने प्रवाशी वर्गातून बांधकाम विभागाच्या कामाचे कौतुक होत आहे.

बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज : क्रांतिकुमार मिरजकर
तालुक्यात पावसाळ्या पुर्वी रस्ते, पुल, मोरी यांची देखभाल दुरूस्तीची कामे पूर्ण करून बांधकाम विभागाकडील रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्यात सुध्दा देखभाल दुरूस्तीची यंत्रणा पूर्ण वेळ कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांनी दिली.