खंडवा येथील श्री दादाजी धुनीवाले मंदिर 10 जुलैपर्यंत बंद – गुरूपौर्णिमा घरीच साजरा करण्याचे भाविकांना आवाहन

0
1016
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 26 : लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मध्यप्रदेशातील खांडवा येथील श्री दादाजी धुनीवाले मंदिर कोरोना संकटकाळामुळे दि. 10 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाविकांनी गुरूपौर्णिमेचे पर्व स्वत:च्या घरी राहूनच साजरे करावे, असे आवाहन खांडव्याचे जिल्हाधिकारी अनय द्विवेदी, तसेच अमरावती जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या अनुषंगाने भाविकांना आवाहन करण्याबाबतचे खांडवा जिल्हाधिका-यांचे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्राप्त झाले. येत्या पाच जुलैला गुरु पौर्णिमा पर्व असून, त्यानिमित्त खांडवा येथे महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, वर्धा, पुणे, जळगाव, अकोला व इतर जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सद्य:स्थितीत खांडवा व लगतच्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित व्यक्ती आढळून येत आहेत. ही साथ अधिक फैलावू नये, यासाठी गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी खांडवा येथे न जाता, उत्सव घरीच साजरा करावा. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व दक्षता नियम पाळून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन श्री. द्विवेदी व श्री. नवाल यांनी केले आहे.