*जिल्ह्यात शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद :- जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित*

0
4180
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 7 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या कालावधीत दर आठवड्यातील शनिवार, रविवार या दोन दिवशी बाजारपेठा बंद राहतील. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. हा आदेश अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लागू आहे.

आदेशानुसार, दर आठवड्यातील शुक्रवार सायंकाळ सातपासून ते सोमवार सकाळी सातपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठा बंद राहतील. सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स येथील पी-1 व पी-2 धर्तीवर या तत्वावर मान्यता दिलेली रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेली किराणा, धान्य दुकाने बंद राहतील. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळयार्ड हे सुद्धा या कालावधीत बंद राहतील.

जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे यादिवशी बंद राहतील. पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी केल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बँका, खासगी बँका, सहकारी संस्था, पतपेढ्या, आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था बंद राहतील. अनावश्यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीद्वारे प्रवास करणा-यांवर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

*खालील सेवा सुरू राहतील*

अत्यावश्यक सेवा यादिवशी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे. सर्व दूध विक्री केंद्रे, डेअरी सकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत सुरु राहतील. सर्व आरोग्य सेवा, औषधी दुकाने त्यांच्या वेळेत पूर्णवेळ सुरु राहतील. ‘एमआयडीसी’तील उद्योग सुरू राहतील. वीज सेवा, गॅस सेवा, यंत्रणांनी मान्सूनपूर्व करावयाची कामे (रोडदुरुस्ती, नालेसफाई आदी) सुरु राहील.

संचारबंदीच्या काळात विवाहसमारंभासाठी ज्यांनी प्राधिकृत यंत्रणांची परवानगी मिळवली आहे, ते समारंभ होऊ शकतील. मात्र, यापुढील कालावधीत शनिवार, रविवार या दिवशी लग्नसमारंभाला परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डीटीएच, केबल सेवा, वृत्तपत्रे सेवा (विक्री व वितरण) सुरू राहतील. यासंबंधित असलेल्या पत्रकार बांधवांना त्यांच्या कामाकरिता संचार करण्याची परवानगी राहील.

पेट्रोलपंप सुरु राहतील. शासकीय हमीभावाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांत होणारी खरेदी सुरू राहील.

*नागरिकांना सहकार्याचे आवाहन*

कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी दक्षता नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 65 वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ, वृद्ध, आजारी व्यक्ती, महिला, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले यांनी आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये. कंटेनमेंट झोनमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत, तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांच्या हालचालीस प्रतिबंध करण्यात यावा. ज्यांना आरोग्य आदी अत्यावश्यक कारणासाठी बाहेर जावे लागेल, त्यांनी मास्क वापरावा. दोन व्यक्तींत किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे.

*प्रशासनाला निर्देश*

संचारबंदीच्या कालावधीत शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी लागू आदेशांनुसार महापालिकेच्या क्षेत्रात पालिका आयुक्त, तालुके व इतर शहरांत मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी आवश्यक अंमलबजावणी करावी. महानगराचे पोलीस आयुक्त, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कडक नियंत्रण ठेवावे. जनजागृतीसाठी ध्वनीक्षेपक, तसेच विविध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.