जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांच्याकडून कोविड रूग्णालयाची पाहणी – आवश्यक सुविधांसाठी व्यवस्थापन टीम

895

अमरावती, दि. २ : जिल्हा कोविड रूग्णालयातील दाखल रूग्णांवर उपचार करताना इतर आवश्यक सुविधाही वेळेत पुरवाव्यात. रुग्णालयातील सुविधा व नित्याच्या दैनंदिन बाबींसाठी स्वतंत्र व्यवस्थापन टीमची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जिल्हा कोविड रूग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली व वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, वैद्यकीय पथकातील ललिता अटाळकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, गत चार महिन्यांपासून वैद्यकीय यंत्रणा जोखीम स्वीकारून अथक परिश्रम घेत आहे. मात्र, धैर्य व संयम कायम ठेवूनच आपल्याला संकटकाळावर मात करता येईल. रुग्णांशी सुसंवाद साधून त्यांचे मनोबल वाढवावे. त्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत पुरवाव्यात. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. इमारतीच्या आवारातही एक स्क्रीन ठेवावी. रुग्णांकडून वेळोवेळी फीडबॅक घ्यावेत. भोजन, पेयजल, स्वच्छता आदी सुविधा काटेकोरपणे पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

वायफाय व इतर यंत्रणाही कार्यान्वित आहेत. त्यानुसार उपचारांसह मनोबल वाढविण्यासाठी, मानसिक ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी संगीत आदी व्यवस्था नियमित ठेवावी.रुग्णालयासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून घेण्याबाबत निर्देशही त्यांनी दिले.

०००

जाहिरात