रेल्वेच्या कामाकडे सरकारचे दुर्लक्ष, ही तर बीडच्या विकासाला खीळ – पंकजाताई मुंडे

0
1202

३७७ कोटीचा थकीत निधी तातडीने देण्याची मुख्यमंत्र्यांना  पत्राद्वारे केली मागणी !

मुंबई दि. २५ – नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाचा ३७७ कोटी रूपयांचा निधी सध्या राज्य सरकारकडे थकीत आहे, बीड जिल्हयाच्या सुपरफास्ट विकासात मानाचा तुरा असणा-या या रेल्वेच्या कामाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, ही तर बीडच्या विकासाला खीळ आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जिल्हयातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्वप्न होते. या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्याने अर्धा अर्धा वाटा देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी प्रकल्पाला दिला आहे, त्या निधीतून सध्या काम सुरू आहे, परंतु राज्य सरकारकडे या प्रकल्पाचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा २२८ कोटी आणि सन २०२०-२१ मधील १४९ कोटी असा एकूण ३७७ कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मंगळवारी रेल्वे अधिका-यांच्या घेतलेल्या व्हर्चुअल आढावा बैठकीतून उघड झाले आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून हा निधी रेल्वे प्रकल्पाला मिळाला नाही, त्यामुळे प्रकल्प रखडण्याची भिती आहे, असे होणे जिल्हयाच्या प्रगतीला फार मोठा अडथळा असून
विकासाला खीळ बसणार आहे. सरकारने त्यांच्या वाट्याचा थकीत ३७७ कोटीचा निधी तातडीने द्यावा तसेच या विषयावर संबंधित जिल्हयाचे खासदार व पालकमंत्र्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना यासंदर्भात आपण एक निवेदन पाठवले असल्याचेही त्या म्हणाल्या.