जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून जिल्हा रूग्णालयाची पाहणी – जिल्हाधिका-यांचे बरे झालेल्या रूग्णांना प्लाझ्मादानाबाबत आवाहन

0
817

 

अमरावती, दि. 13 : कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना होत असताना जिल्हा रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनची सुविधाही लवकरच कार्यान्वित होईल. या व इतर सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड रूग्णालयासह इतर रूग्णालयातही विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. रूग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँकच्या अनुषंगाने उपलब्ध जागा, आवश्यक यंत्रणा आदी कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात उपलब्ध खाटा, आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहून सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, वैद्यकीय यंत्रणेतील सुविधा व्यवस्थापक डॉ. सुरेश धारपवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी सारी वॉर्डाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

प्लाझ्मादानाबाबत आवाहन

जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. जिल्ह्यात प्लाझ्मादानाबाबत यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बरे झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मादान करावे. आपल्या या कृतीमुळे एखाद्या रूग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांनी पुढे येण्याचे त्यांनी केले.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.

हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.

00000