*कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर , ‘महावितरण’ला कारवाईचे निर्देश :- कंत्राटी वीज कामगारांना न्याय मिळवून द्यावा – कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू*

2051
जाहिरात

 

अमरावती, दि. १५ : कंत्राटी वीज कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार सुविधा न पुरवता खोटी कारणे देऊन कामाहून काढून टाकणे असे प्रकार करून
अन्याय केल्याच्या तक्रारी कामगार बांधवांकडून प्राप्त होत आहेत. हा प्रकार गंभीर असून ‘महावितरण’ने याबाबत धडक कारवाई करावी व कामगार बांधवांना न्याय मिळवून द्यावा, असे स्पष्ट निर्देश कामगार, जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

‘महावितरण’च्या येथे कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व त्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक याबाबत ‘महावितरण’च्या कार्यालयात बैठक राज्यमंत्री श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तसेच अमरावती विभागाचे कामगार उपायुक्त व कंत्राटी कामगार बांधव उपस्थित होते .

‘महावितरण’द्वारा नियुक्त कंत्राटदारामार्फत कामगारांना नियमानुसार सुविधा मिळत नाहीत. त्यांच्या पगारातून अन्यायकारक बेकायदेशीर कपात केली जाते. त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून कागदपत्रे तयार होतात, बनावट चौकशी अहवाल दिले जातात. त्याबाबत कामगार बांधवांनी तक्रार केल्यास तडकाफडकी कामावरून कमी केले जाते. हे सगळेच प्रकार गंभीर व संतापजनक आहेत.
असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गरीब कामगार बांधवांवर अन्याय झाल्यास कुणाचीही गय करणार नाही, असा इशारा कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी
यावेळी दिला.

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ काटेकोर चौकशी करून संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे निर्देश यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.