अमरावती :- मास्क न वापरणा-यांविरुद्ध पोलीसांची धडक मोहिम

0
880

अमरावती, दि. 23 : कोरोना प्रतिबंध दक्षतेचा अवलंब न करणा-यांविरुद्ध पोलीसांनी धडक मोहिम सुरू केली असून, गत दोन दिवसांत शंभरहून अधिक बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

          वाहतूक पोलीसांनी मास्क न वापरणा-यांविरुद्ध शहरातील वेस्ट झोनमध्ये ७४, तर इस्ट झोनमध्ये ३४ अशा एकूण १०८ केसेस केल्या असून, बेजबाबदार नागरिकांवर दंड वसुलीची कारवाई केली आहे.

          मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता उपायांचा अवलंब न करणा-या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणा-या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यापूर्वीच दिले होते. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही दक्षतेचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुणी जर दक्षता न घेता सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवित असेल तर त्याविरुद्ध पोलीसांनी कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही पोलीसांना दिले होते. त्यानुसार पोलीसांनी अशा बेजबाबदार नागरिकांविरुद्ध मोहिमच उघडली आहे.

          जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, या मोहिमेचे स्वरूप अधिक व्यापक केले जाणार आहे. त्यामुळे कारवाईची वेळ येऊ देऊ नये.  कोरोनापासून स्व-संरक्षणाची व आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची आपली  जबाबदारी ओळखा आणि मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.