अकोला पोलिसांची आता” नो मास्क नो राईड” मोहीमःदुचाकी चालकांनी मास्क न वापरल्यास कारवाई

0
370

अकोलाःसंतोष विणके

मागील 10 दिवसा पासून शहर वाहतूक शाखा अकोला शहरात नो मास्क नो सवारी ही मोहीम राबवित आहे, सदर मोहिमेची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्यांनी घेतल्या नंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात सुद्धा वाहतूक शाखेकडून ही मोहीम सुरू करण्यात आली, ह्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम अकोला शहरात दिसायला सुरवात झाली असून अकोला शहरात प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटो चालकांनी कारवाईच्या भीतीने का होईना मास्क वापरण्यास सुरवात केली असल्याचे दिसून आले व सवारीला सुद्धा मास्क घालण्यासाठी आग्रह करतांना दिसले , ह्याचा सकारात्मक परिणाम कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात का होईना कमी होतांना दिसत आहे,

ऑटो चालक व सर्व सामान्य नागरिकांच्या सहकार्याने, कोरोनाचा हा घटता ग्राफ तसाच ठेवणेसाठी आता शहर वाहतूक शाखेने कंबर कसली असून आगामी सण उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता नो मास्क नो सवारी च्या धर्तीवर पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात आता ” नो मास्क नो राईड” ही मोहीम राबविणार आहे,

भविष्यात येणारे सण उत्सव व करोना ची येऊ शकणारी संभाव्य दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमे अंतर्गत शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन सर्व सामान्य नागरिकांनी केले व प्रशासनाला सहकार्य केले तरच अकोला जिल्ह्यातील घटत असलेला करोना संक्रमणाचा ग्राफ कायम ठेवण्यात यशस्वी होऊ त्या साठी ज्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे शक्य होणार नाही अश्या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा राबवून मास्क आवश्यक केला आहे,

त्याच धर्तीवर आता दुचाकी चालविताना मास्क आवश्यक राहील विशेष करून दुचाकीवर डबल सीट जातांना मोटारसायकल चालविणाऱ्या व मागे बसलेल्या व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक राहील, मास्क शिवाय मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला असून नागरिकांनी करोना संक्रमण रोखण्यासाठी सदर मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे।