शिवसेनेच्या दणक्यामुळे बेंबळी गावात पाणी पुरवठा सुरु ; शिवसेनेच्या ढाण्या वाघांची प्रशासनाने घेतली धास्ती

0
928
Google search engine
Google search engine

शिवसेनेच्या दणक्यामुळे बेंबळी गावात पाणी पुरवठा सुरु ;
शिवसेनेच्या ढाण्या वाघांची प्रशासनाने घेतली धास्ती
उस्मानाबाद / प्रतिनिधी –
थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या इशारा देत रिकाम्या खुर्चीला निवेदन चिटकवण्याचे आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या दणक्यामुळे प्रशासनाला जाग आली असून बेंबळी गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. परिसरातील प्रकल्प भरलेले असतानाही पाणी उपलब्ध नसल्यामुळे दिवाळीत नागरिक हतबल झाले होते.
बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रुईभर येथील मध्यम प्रकल्प पावसामुळे महिनाभरापूर्वीच तुडुंब भरला आहे. परंतु राजकीय व प्रशासकीय उदासीनतेमुळे गावात नळाला पाणी सोडण्यात येत नव्हते. यामुळे गावातील सर्व नागरिक दसरा व दिवाळीच्या सणामध्ये पाण्याअभावी हतबल झाले होते. याच वेळी गावातील शिवसेनेचे नेते श्यामसुंदर पाटील व अनिल बागल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत मध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. परंतु प्रशासकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे खुर्चीला निवेदन चिटकवण्यात आले. या निवेदनामध्ये दिवाळीत पाणीपुरवठा सुरू न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. प्रशासनाला यामुळे जाग आली. शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली होती. तसेच वॉल्व व विद्युत पंप खराब झाले होते. श्यामसुंदर पाटील व अनिल बागल यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सुरळीत करण्यात आली. पाटील यांनी या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांना भेटून गावातील परिस्थिती सांगितली होती. दोघांनीही यासंदर्भात प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. यासोबतच तातडीने पाणी सुरू न झाल्यास शिवसैनिकांनाही आंदोलन करण्यासाठी पाठिंबा दर्शवला. परिणामी पाणी सुरू करण्यात आले आहे. गावाला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा नळाद्वारे करण्यात येणार आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे शिवसेनेला आंदोलन न करण्यासंदर्भात सुचित केले.
सुरुवातीला गणेश नगर व विजयनगर भागात पाणी सोडण्यात येणार आहे त्यानंतर उर्वरित गावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामसेवक करपे यांनी दिली. दरम्यान ग्रामपंचायत मध्ये निवेदन देत असताना शिवसेना नेते श्यामसुंदर पाटील, अनिल बागल यांच्यासह हनुमंत जाधव, मुकुंदराज आगलावे, विशाल शहा, किरण मोहिते, दगडू राऊत उपस्थित होते.