कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन – कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, बोडसड रोगाच्या व तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळयांचे व्यवस्थापन बाबत

0
912
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 17 : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपर्यंत होता परंतु त्यात होवुन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाडयात तो 15 ते 20 टक्के झाला. नोव्हेंबर महिन्यात वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यपरिस्थितीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक किंवा दोन वेचण्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंडया तर कुठे 50 ते 60 बोंडे आहेत. ज्या ठिकाणी कापसाला कमी बोंडे आहेत, बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घ्यावा. पण ज्या ठिकाणी बोंडाची संख्या जास्त आहे व बोंडे हिरवी आहेत अशा ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे कृषी विभागाने सुचविले आहे.

शेतात ज्याठिकाणी प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यादरम्यान आहे, अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 टक्के ई.सी. 3.5 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ई.सी. 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 ई.सी. 12 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15दिवसांनी दुसरी फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवश्यक्तेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढु नये म्हणुन खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ट्रायझोफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामिप्रीड 7.7 टक्के 10 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के डब्ल्यु/डब्ल्यु एससी 12 मिली आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. त्याचप्रमाणे बोंडसड होवु नये म्हणुन वरील किटकनाशकामध्ये कॉपर ऑक्झीक्लोराईड मिसळुन फवारणी करावी.

कापुस पिकामध्ये बोंडसड हा जटील रोग असुन रोगास कारणीभूत असणाऱ्या असंख्य बुरशीमुळे हा रोग होतो. सुरुवातीला बोंडावर करडे किंवा काळे लहान ठिपके येतात व पुढे हे ठिपके वाढुन पूर्ण बोंड व्यापतात. पुढे हा संसर्ग वाढुन बोंडातील आतील पेशीवर पसरतो व त्यामुळे बोंडातील कापुस व सरकी सडते. अशी बोंडे कधीच फुटत नाही आणि अकालीच गळुन पडतात. काही प्रकरणामध्ये बाह्य कारणांमुळे बोंड सडणे ही बाब असु शकते. पाती व बोंड धरण्याच्या टप्प्यात जोरदार पाऊस पडणे, किटकांमुळे बोंडाना होणारी इजा मुख्यतः कापसावरील तांबडया ढेकणामुळे होणारी इजा, दाट किंवा अती दाट लागवड व नत्र खताचा वारेमाप वापरामुळे या बुरशी वाढतात. प्रादुर्भावग्रस्त बोंडामुळे या बुरशी जमीनीत वाढतात. किटकांमुळे या बुरशीचा प्रसार होतो. किटकांमुळे बोंडावर झालेल्या जखमामधुन या बुरशीचा प्रवेश होतो.

कृषि विद्यापिठांनी शिफारस केलेल्या खत मात्रेचाच वापर केला पाहिजे. बोंडअळी करीता वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकासोबत कॉपर ऑक्झीक्लोराईड 1 ते 2 ग्रॅम प्रती लिटर किंवा कार्बेन्डाझिम 50 टक्के डब्ल्यु.पी. 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थीतीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे चार ते पाच फुट उंचीचे असुन त्याच्या फांद्याही दाटलेल्या आहेत, अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते म्हणुन कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाने फवारणी किटचा वापर करुनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी.

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमिनीत ओल आहे, त्यामुळे तुरीचे पिक चांगले आहे. काही ठिकाणी कळी किंवा फुलोरा अवस्थेत आहे. शेतकरी बांधवांना तुर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आह. मात्र, मागील आठवडयात असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तुर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. व अशा वातावरणामुळे तुर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीकरीता निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी. 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. शेतकरी बंधुनी अधिक माहितीकरीता कृषि सहायक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000