*जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी-विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी संमती आवश्यक*

771
????????????????????????????????????
जाहिरात

 

अमरावती, दि. 21 : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही शाळा व्यवस्थापन समित्यांच्या समन्वयाने पुरेशा दक्षता नियमांची अंमलबजावणी करत शाळा सुरु होतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.

शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येत आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक व पालक वर्ग यांची मते जाणून घेऊनच व सुरक्षेबाबत संपूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरु करण्यात येत आहेत. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. शाळेतील सुविधा व परिसरातील येण्या-जाण्याचे मार्ग, गर्दीची ठिकाणे आदी लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या विचार विनिमयानंतरच शाळा चालू करण्यात याव्यात अशी सुचना शाळांना देण्यात आल्या आहे.

याबाबत गर्दी टाळण्यासाठी सत्रनिहाय वर्ग घेणे सोयीचे ठरेल किंवा वेगवेगळ्या वर्गांचे दिवस निश्चित करता येतील. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, हॅन्ड वॉशची व्यवस्था असणे आवश्यक आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासह वसतीगृह व आश्रमशाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन नियोजन व्हावे व त्यानंतरच शाळा सुरु करावी. विद्यार्थी पटसंख्या आणि शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांप्रमाणे इयत्ता नववी व इयत्ता अकरावी एक दिवस तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी एक दिवस या प्रमाणे एक दिवसाआड विद्यार्थ्यांना सम विषम पद्धतीने शाळेमध्ये उपस्थिती बाबत शाळा व्यवस्थापन समिती निर्णय घेवू शकते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावरही भर देण्यात येत आहे.

कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन आवश्यक

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्याबाबत सावधगिरी म्हणून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याबाबत चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे आदी नियम भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई देखील व्यापक स्वरुपात केली जाणार आहे. मास्कचे महत्व हे नागरीकांच्या मनावर बिंबविणे अत्यंत आवश्यक असून सध्यातरी लस उपलब्ध नसल्यामुळे मास्क हाच संसर्गापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे ऑक्सीजन टँक कार्यान्वित झाला असून पीडीएमसी रुग्णालयातही येत्या दोन दिवसात काम पूर्ण होईल. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता नियमांचे पालन नागरीकांनी काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जाहिरात