*महापालिका क्षेत्रालगतच्या गावांतही संचारबंदी – जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

3340

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून सोमवारी रात्रीपासून एक आठवड्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सीमेलगतच्या विविध गावे व भागाचाही आता संचारबंदीत समावेश करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनाच्या सूचनापत्रानुसार हे आदेश निर्मगित करण्यात आले आहेत. अमरावतीलगतच्या कठोरा बु., रामगांव, नांदगाव पेठ, वलगांव, रेवसा व बोरगांव धर्माळे गावातील बिजिलॅण्ड, सिटीलॅण्ड, ड्रिमलॅण्ड मार्केटचा परिसर (सर्व अमरावती तालुका), तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत क्षेत्रा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रासह शहरालगतचे उर्वरित क्षेत्र ज्या ठिकाणी बाधितांची संख्या अधिक आहे, त्या क्षेत्रांचा या आदेशात समावेश करण्यात आला आहे. या आदेशानुसार या सर्व गावांत व परिसरात जीवनावश्यक वस्तू दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. परवानगीप्राप्त उद्योग सुरु राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. शासकीय कार्यालयांतून पंधरा टक्के किंवा पंधरा व्यक्ती यापैकी जास्त असलेल्या संख्येइतक्या व्यक्ती उपस्थित राहतील. शाळा, शिकवण्या बंद राहतील. मालवाहतूक व वाहतूक सुरु राहील, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिका-यांनी आज शहरात विविध ठिकाणी जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. नेहरू मैदान व शासकीय दंत महाविद्यालयाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली व दक्षतापालनाबाबत निर्देश दिले.

जाहिरात