_कोरोना प्रतिबंधक उपाययोजना_ *रुग्णांकडून जादा दर आकारल्याने 3 हॉस्पिटल ला नोटीस* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून कारवाई*

2014

 

अमरावती, दि. २३ : कोरोना उपचार व तपासणीसाठी शासनाने निश्चित दर आकारून दिलेले असतानाही रुग्णांकडून जादा दर आकारणा-या बारब्दे हॉस्पिटल, न्यू अंबिके डायग्नोस्टिक सेंटर व सिटी हॉस्पिटल या तीन रूग्णालयांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करण्यात आली आहे.

उपचार घेणा-या सामान्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून खासगी रूग्णालयांकडून विविध आजाराच्या उपचार व तपासणीसाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. कोविड व नॉनकोविड रुग्णांकडून रुग्णांकडून शासकीय दरानुसार आकारणी होते किंवा कसे, हे पडताळण्यासाठी पथकेही गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांनी आज सकाळी स्वत:ही काही रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली. पथकातर्फे केलेल्या तपासणीनुसार उपजिल्हाधिकारी राम लंके व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन सानप यांनी सादर केलेल्या अहवालावरून जिल्हाधिका-यांनी संबंधितांना नोटीसा जारी केल्या आहेत.

*तीन रुग्णालयांकडून जादा दर आकारणी*

तपासणीनुसार, बारब्दे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये शासनाच्या दर परिपत्रकाचे पालन होत नसल्याचे दिसून आले. सर्वसाधारण वॉर्ड, अतिदक्षता वॉर्ड असा भेद न करता रुग्णांकडून सरसकट प्रतिदिन 9 हजार रूपये दर आकारण्यात आला. शासकीय दरफलकाचा फलकदेखील तिथे लावलेला नव्हता.

न्यू अंबिके रेडिओ डायग्नोस्टिक अँड फिजिओथेरपी सेंटरमध्ये सर्व रूग्णांना सरसकट अडीच हजार रूपये दर आकारण्यात आले. वास्तविक शासन निर्णयानुसार हा केवळ दोन हजार रूपये दर आकारणे आवश्यक होते. तिथेही शासकीय दरपत्रक लावले नव्हते. पावती पुस्तकात अडीच हजार व रजिस्टरमध्ये दोन हजार असे वेगवेगळे दर नोंदविल्याचे दिसून आले. त्याशिवाय, ‘न्यू अंबिके’ने तर पावतीपुस्तकात चांगला कार्बनदेखील वापरला नाही. त्यामुळे अनेक नोंदी अस्पष्ट होत्या व त्या तपासता आल्या नाहीत.

सिटी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये नोंदणी, तपासणी, एक्स रे आदी दर शासन दरानुसार आकारले जात नसल्याचे दिसून आले. तिथेही वॉर्डचा सर्वसाधारण, अतिदक्षता असा भेद न करता रुग्णांकडून सरसकट प्रतिदिन 9 हजार रूपये दर आकारण्यात आला. दरफलक सिटी हॉस्पिटलमध्येही लावलेला नव्हता.

तपासणीनुसार, बारब्दे हॉस्पिटल, न्यू अंबिके डायग्नोस्टिक सेंटर व सिटी हॉस्पिटलने ज्या रुग्णांकडून जादा दर आकारले आहेत, ती रक्कम त्या रुग्णांच्या खात्यात जमा करण्यासाठी रेखांकित धनादेशाद्वारे परत करण्याचे व्हावेत व या तिन्ही रुग्णालय, केंद्राची महापालिकेच्या अंकेक्षण पथकाद्वारे तपशीलवार तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे, रूग्णनिहाय जादा आकारणीच्या रकमेचे संकलन करून ही रक्कम रुग्णांना परत केली किंवा कसे, याचीही पडताळणी व्हावी, ही शिफारस पथकाने केली. त्यावरून या तिघांनाही जिल्हाधिका-यांनी नोटीस जारी केली आहे.

महावीर हॉस्पिटलमध्येही शासकीय दरपत्रकाचा फलक दर्शनी भागावर लावलेला नव्हता. एक्झॉन हॉस्पिटल येथे सीबीसीचे दर स्वतंत्रपणे आकारल्याचे आढळले. त्याबाबतही कार्यवाही केली जात आहे. शहरातील बख्तार व बेस्ट हॉस्पिटलमध्ये कामकाज नियमानुसार चालत असल्याचे पथकाला आढळले.

*जादा दर आकारल्यास खबरदार*

रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी रुटीन वॉर्ड व आयसोलेशनसाठी अधिकतम दर चार हजार, अतिदक्षता वॉर्डात व्हेंटिलेटर नसेल तर साडेसात हजार रूपये व व्हेंटिलेटर असेल तर 9 हजार रुपये निश्चित केलेले आहेत. त्यात सीबीसी, युरिन रुटीन, एक्स रे, ईसीजी, बेड चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस आदी विविध सेवांचा समावेश आहे.

कुठल्याही रूग्णालयांकडून सामान्य रुग्णांकडून जादा दराची आकारणी केली व रुग्णांची फसवणूक होत असल्याचे आढळले तर यापुढे याहूनही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

 

000

जाहिरात