*सद्य:स्थितीत कोरोनाची साथ रोखणे हे सर्वोच्च प्राधान्य* *लॉकडाऊनचा निर्णय समाजाच्या सुरक्षिततेसाठीच*

0
1646
Google search engine
Google search engine

 

*पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर*

अमरावती, दि. 24 : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या निर्देशानुसारच केवळ अमरावतीतच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाची साथ रोखणे हे सर्वात महत्वाचे प्राधान्य असून, लॉकडाऊनचा निर्णय नागरिक व समाजाच्या सुरक्षिततेसाठीच घेण्यात आला आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

फेब्रुवारीमध्ये गत 23 दिवसांत अमरावती जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक बाधित आढळले. त्यापूर्वी गत सप्टेंबरमध्ये बाधितांची संख्या सर्वाधिक होती. आता फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण त्याहूनही मोठे आहे, असे सांगून पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय झाला. पूर्वीच्या लॉकडाऊन कालावधीपेक्षाही आता अधिक बाधित आढळत असल्याने लॉकडाऊन व संचारबंदीशिवाय पर्याय उरला नाही.

त्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाधित आढळले आहेत, तिथे लॉकडाऊन व संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम विदर्भात बाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, हिंगोली, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यातही तेथील परिस्थितीनुरूप रात्रीची संचारबंदी व वेगवेगळे निर्बंध घालण्यात आले आहेत.

त्यामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यातच संचारबंदी लागू आहे, असे नाही. त्यामुळे याबाबत कुठेही राजकारण होऊ नये. हा लोकांच्या जिविताचा प्रश्न आहे. नागरिक सुरक्षित राहावेत, त्यांचे आरोग्य जपले जावे यासाठी संपूर्ण समाजाच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा गेले वर्षभर कोरोनाविरोधात अहोरात्र झटत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखली नाही तर आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढेल व आरोग्य सेवा विस्कळीत होतील. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशन, प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी चर्चा करून व सर्व बाबी तपासून हा निर्णय झाला, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, संसर्ग रोखण्यासाठी जे जे करता येईल, ते सर्व प्रयत्न शासन- प्रशासनाकडून होत आहेत. कोरोनाचा संसर्ग हा प्रत्यक्ष संपर्कातून होत असल्याने कुठेही गर्दी न होणे, मास्कचा वापर, स्वच्छता आदी बाबींचे पालन आवश्यक असते. या दक्षतासूत्रीचा नागरिकांच्या जीवनशैलीत समावेश होणे आवश्यक आहे. त्यामुळे सुसज्ज उपचार यंत्रणेबरोबरच ‘सोशल बिहेवियर चेंज’साठी विविध प्रयत्न, सर्वेक्षण, दंडात्मक कार्यवाही, मोहिमा, जनजागृती या सगळ्या गोष्टी होतच आहेत. त्यानंतरही अनेक नागरिक मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. हे स्वत:सह इतरांचीही सुरक्षितता धोक्यात आणणे आहे. त्यासाठी वेळोवेळी दंडात्मक कार्यवाहीही केली जाते. मात्र, त्याचबरोबरच बाधितांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले.

गर्दीच्या ठिकाणी अनेकजण एकत्र येत असल्याने संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे बाधितांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन यापुढे गर्दी टाळली जावी व कोरोनाची साखळी तुटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीमधील बाधितांची संख्या हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना हा निर्णय घेणे आवश्यक होते.

नागरिकांची सुरक्षितता व आरोग्याची जपणूक हे महाविकास आघाडीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून नागरिकांचे हित जपण्यासाठी जे जे योग्य, ते सर्व करण्याचा आमचा निर्धार आहे. साथीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवेसाठी अहोरात्र राबणा-या व विविध जबाबदा-या पार पाडणा-या डॉक्टर, पारिचारिका, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका या सर्वांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत. जगाला त्रस्त करून सोडणा-या कोरोना या भयंकर साथीविरुद्धची लढाई ही अखिल मानवजातीच्या हिताची लढाई आहे. त्यामुळे राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग द्यावा. नागरिकांनीही संचारबंदीचे नियम, तसेच दक्षतासूत्री पाळून आपले आरोग्य, तसेच इतरांचेही आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

000