विनाकारण फिरणा-यांची वाहने होणार जप्त ;  पेट्रोलपंपांवरही ‘नो मास्क- नो पेट्रोल’   

0
1416
Google search engine
Google search engine

        प्रशासनाच्या प्रयत्नांना विविध संघटनांची साथ

अमरावती, दि. 24 : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन संचारबंदी लागू केलेली असतानाही अद्यापही नियम न पाळणा-यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढविण्यात आली असून, विविध संघटनाही प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी पुढे येत आहेत.

            पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी, फिक्स पॉईंट व पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह विविध पोलीस अधिकारी नाकाबंदी व फिक्स पॉईंटला भेट देऊन व शहरात ठिकठिकाणी तपासणी करत आहेत. हॉटेलमधून पार्सलची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अनेकदा या सवलतीचा गैरफायदा घेऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे व समाजविघातक आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई करण्याचा, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

            दरम्यान, जिल्हाधिका-यांनी आज पेट्रोल- डिझेल पंपचालकांच्या संघटनेची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेने मास्क नसलेल्या व विनाकारण फिरणा-या नागरिकांना पेट्रोल व डिझेल न देण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व पंपावर त्यासाठी फलकही लावण्यात येतील. अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडणा-या व्यक्तींनाच पेट्रोल देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी आवश्यक विचारणा आदी प्रक्रिया पंपावर करण्यात येईल, असे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र मेहता, सचिव सौरभ जगताप, सदस्य अखिलेश राठोड आदी यावेळी उपस्थित होते