कोरोना प्रतिबंधक उपाययोजना *लॉकडाऊन व संचारबंदी एक आठवड्याने वाढवली*

0
4063
Google search engine
Google search engine

 

 

अमरावती, दि. 27 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वीच अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र व लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली. हे निर्बंध पुढील आठवड्यापर्यंत (8 मार्च) कायम ठेवण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही तेथील बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या तिन्ही शहरांत दि. 1 मार्चच्या सकाळी 6 वाजतापासून दि. 8 मार्चच्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही माहिती दिली. साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.

वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत व त्यासाठी निश्चित केलेल्या वेळा कायम आहेत. त्यानुसार अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी आठ ते 3 या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजार बंद राहतील. उपाहारगृहे व हॉटेलला केवळ पार्सल सेवा पुरवता येईल. शासकीय कार्यालयांत 15 टक्के किंवा किमान 15 व्यक्ती उपस्थित असाव्यात. मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत.

ठोक भाजीमंडई पहाटे दोन ते पहाटे सहा या वेळेत सुरु राहील व त्यात केवळ किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. तिन्ही शहरांतील शाळा, महाविद्यालये, शिकवण्या, क्लासेस बंद राहतील. शासकीय, निमशासकीय परीक्षांना परवानगी आहे. व्यायामशाळा, चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे बंद असतील.

अमरावतीलगतच्या कठोरा बु., रामगांव, नांदगाव पेठ, वलगांव, रेवसा व बोरगांव धर्माळे गावातील बिजिलॅण्ड, सिटीलॅण्ड, ड्रिमलॅण्ड मार्केटचा परिसर (सर्व अमरावती तालुका), तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, अचलपूर तालुक्यातील कांडली, देवमाळी तसेच भातकुली तालुक्यातील भातकुली नगरपंचायत, तसेच अंजनगाव सुर्जी शहरातलगतचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले असून, तिथेही ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यानुसार घोषित करण्यात आलेले कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह‌यातील इतर क्षेत्रांमध्ये यापूर्वी लागू निर्बंध व सवलती कायम आहेत. त्यानुसार तिथे दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहतील.

000