नेहरू मैदानावरील चाचणी केंद्र सायंकाळीही सुरू – पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांची माहिती

0
691
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 27 : शहरातील नेहरू मैदानावरील महापालिकेच्या शाळेत आरटीपीसीआर चाचणी केंद्र करण्यात आले असून, ते आता दोन सत्रात चालू राहील. गरजू नागरिकांच्या सुविधेसाठी हे केंद्र आता सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेतही सुरू राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

            महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोविड-19 बाधित रुग्‍णांचे सहवासित व संपर्कात आलेल्या हाय रिस्‍क व्‍यक्‍तींची तसेच संशयित रुग्‍णांची रॅपिड अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्‍यासाठी महापालिका रुग्णालय आयसोलेशन केंद्र व मनपा शाळा नेहरु मैदान या ठिकाणी यापूर्वीच व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन विलासनगरातील मनपा शाळा क्र.17, बडनेरा पोलीस ठाण्यामागील मनपा शाळेच्या परिसरात रॅपिड अँटिजेन व आरटीपीसीआर केंद्र सुरू असल्याची माहिती पालिकेचे आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी दिली.

            नागरिकांनी संयम व शिस्त पाळावी : आयुक्तांचे अमरावतीकरांना आवाहन

 

अमरावती शहरात कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे गर्दी टाळलीच पाहिजे. कोरोनाचा संसर्ग हा संपर्कातून होतो. त्यामुळेच सोशल डिस्टन्सिंगचे तत्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी संयम व शिस्त पाळण्याचे आवाहन आयुक्त श्री. रोडे यांनी केले आहे.

            कार्यक्रमांचे महत्व सर्वांसाठीच मोठे असते. मात्र, साथीचा प्रादुर्भाव व स्वत:ची, तसेच इतरांची सुरक्षितता जोपासणेही तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा स्मशानभूमीतही गर्दी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमालाही जास्तीत जास्त 10 व्यक्तींनीच जावे. स्मशानभूमीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणून यापुढे कमीत कमी लोकांना सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही संयम, शिस्त व विवेकपूर्ण वागणुकीची वेळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त श्री. रोडे यांनी केले आहे