घरी होणाऱ्या लग्न समारंभालाही नियम बंधनकारक ; नियम तोडणाऱ्यावर होणार कारवाई- जिल्हाधिकारी

0
2065
Google search engine
Google search engine

घरी होणाऱ्या लग्न समारंभालाही नियम बंधनकारक
नियम तोडणाऱ्यावर होणार कारवाई- जिल्हाधिकारी
भंडारा दि. 1:- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दीच्या कार्यक्रमावर शासनाने बंदी घातली असून मंगल कार्यालयात होणारे लग्न समारंभ मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश आहेत. मात्र लोक मंगल कार्यालयाऐवजी घरीच लग्न समारंभ आयोजित करत असून या कार्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत. ही बाब गंभीर असून घरी होणाऱ्या लग्न कार्यास सुद्धा नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच सक्त कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोविड 19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनाने काही नियम ठरवून दिले आहेत. विशेषतः गर्दीचे कार्यक्रम व लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींवर मर्यादा आणली आहे. मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभात उपस्थिती मर्यादा पाळणे बंधनकारक केल्यानंतर नागरिक आपल्या घरी लग्न समारंभ आयोजित करून मोठ्या प्रमाणात पै-पाहुण्यांना उपस्थित ठेवतात. जिल्ह्यात काही ठिकाणी ही बाब लक्षात आली आहे. हा प्रकार गंभीर असून ‘सुपर स्प्रेडर’ ठरणारा आहे. तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. जी उपस्थिती मर्यादा मंगल कार्यालयात लागू आहे तीच सर्व ठिकाणी लागू आहे ही बाब लग्न आयोजित करणाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
मंगल कार्यालय, मोहल्ला अथवा घरी आयोजित लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त लोक आढळून आल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येईल असे म्हणाले.
00000