गृह विलगीकरणाचे नियम तोडणा-याला 25 हजारांचा दंड ; बेशिस्त रूग्णाला आता संस्थात्मक विलगीकरणात ठेवणार

0
1896
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 2 : गृह विलगीकरणात असूनही बिनधास्त बाहेर फिरणा-या एका रुग्णाला पंचवीस हजार रूपये दंड ठोठावण्यासह, त्याला आता घरात न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

            जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकांनी ही कारवाई केली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मात्र, कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते.

गृह विलगीकरणातील रुग्ण नियम पाळत नाहीत आणि घराबाहेर पडून इतरांना जोखमीत टाकतात, म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाईचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला होता. त्यानुसार गृह विलगीकरणासाठी दंडाच्या तरतुदीसह बंधपत्र लिहून घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. गृह विलगीकरणाचे नियम पाळले जावेत, यासाठी कसोशीने देखरेख करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकेही नियुक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे, असे आढळल्यास नागरिकांनीही माहिती देण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले.

त्यानुसार शहरातील ज्योती कॉलनी येथील एक रुग्ण घराबाहेर फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून डॉ. सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ज्योती कॉलनीकडे धाव घेतली. रुग्णाच्या घरी गृह विलगीकरणाबाबत सुस्पष्ट फलक लावण्यात आलेला होता. मात्र, रुग्ण घरी नसल्याचे आढळून आले. पथकाने यासंबंधी आणखी चौकशी व तपास केला. त्यावेळी सदर रूग्ण कसलीही पर्वा न करता खुशाल दुचाकीवर फिरत असल्याचे पथकाला आढळून आले.

 रुग्णाने गृह विलगीकरणात राहण्यासाठी दिलेल्या बंधपत्राचा भंग करून इतरांनाही जोखमीत टाकल्याने त्याला 25 हजार दंडाची नोटीस तत्काळ बजावण्यात आली. त्याचबरोबरच, या रूग्णाची गृह विलगीकरणाची परवानगी रद्द करत त्याला आता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढे यावे

शहर आयुक्तांचे अमरावतीकरांना आवाहन

 

लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्यांच्या सुविधेसाठी गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. त्यांच्याकडून बंधपत्रही लिहून जाते. मात्र, असे असतानाही कुणीही गृह विलगीकरणाचा भंग करून इतरांचा जीव धोक्यात घालून साथीचा प्रादुर्भाव वाढवणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे कुठेही झाल्याचे आढळल्यास अमरावतीकरांनी महापालिकेच्या पथकांना माहिती द्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.