कोरोना प्रतिबंधक उपाययोजना :- नवी यंत्रणा कार्यान्वित; विद्यापीठ लॅबची तपासणी क्षमता 1700 वर  

0
1254

 अहवाल जलद मिळण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित

                                जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून पाहणी

अमरावती, दि. 3 : कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामुळे या लॅबकडून आता दिवसाला 1700 अहवाल मिळणार आहेत. आरोग्य यंत्रणेला अहवाल वेळेत कळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सकाळी लॅबची पाहणी व तज्ज्ञांशी चर्चा केली.

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर अहवाल देणारी प्रयोगशाळा असावी म्हणून दहा महिन्यांपूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लॅब सुरू करण्यात आली. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला. सुरुवातीच्या काळात या लॅबमध्ये दिवसाला शंभर नमुने तपासले जात होते. मात्र, साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही क्षमतावाढ करत हजारपर्यंत नेण्यात आली. दरम्यान, पीडीएमसी रूग्णालयातही चाचण्यांची सुविधा झाली. अहवाल तत्काळ मिळून रूग्णांना वेळेत उपचार मिळवून शक्य झाले. या कामाला आणखी गती मिळावी म्हणून आता विद्यापीठात नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. नवाल यांनी दिली.

                                    सॉफ्टवेअरही विकसित : डॉ. प्रशांत ठाकरे

लॅबकडून आरोग्य यंत्रणेला वेळेत अहवाल मिळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचा युझर आयडी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे लॅबकडे चाचणीच्या निष्कर्षाची नोंद झाल्यावर तत्काळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांना ऑनलाईन माहिती कळणार आहे. त्यामुळे रूग्णांना माहिती कळवणे, उपचार आदी कामे ही दोन्ही कार्यालये गतीने करू शकतील, असे ‘कोविड-19 मॉलेक्युलर डायग्नोस्टिक लॅब’चे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले.

                                                निष्कर्ष लवकर कळतील : डॉ. सुधीर शेंडे

                                    आरटीपीसीआर चाचण्या करणारी ॲटोमॅटिक एक्स्ट्रॅक्टरसह अद्ययावत यंत्रणा दोन दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे लॅबची क्षमता प्रतिदिवस 1700 पर्यंत वाढली आहे. नमुने आल्यापासून ते निष्कर्ष हाती येईपर्यंतच्या कालावधीतही यामुळे घट होणार आहे. त्यामुळे जलदगतीने निष्कर्ष हाती येतील व पुढील उपायांना चालना मिळेल, असे लॅबमधील तज्ज्ञ डॉ. सुधीर शेंडे यांनी सांगितले.

            या लॅबमध्ये चार कक्षात काम चालते. सलग टेस्टिंगकरिता विविध पथके कार्यरत असून, सुरक्षिततेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. लॅबमधील स्टाफकडून प्रत्येक काम दक्षतापूर्वक केले जाते. गत दहा महिन्यांपासून हे काम अविरतपणे सुरू असल्याची माहिती तंत्रज्ञ अपर्णा जाधव व सचिन अवचार यांनी दिली.