अमरावती शहरात तिस-या टप्‍प्‍यातील लसीकरण सुरळीत ; लसीकरण केंद्रांची महापौरांकडून पाहणी

0
840
Google search engine
Google search engine

*सहव्याधी असणा-या ४५ वरील नागरिकांना लसीकरणासाठी प्रमाणपत्र बंधनकारक*

– *आरोग्य विभागाची माहिती*

अमरावती, दि. 3 : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम महापालिकेकडून डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व दंतचिकित्सा महाविद्यालयात सुरळीत राबविण्यात येत आहे.

त्यात साठीपुढील ज्येष्ठांसह सहव्याधी असणा-या 45 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. सहव्याधी असणा-या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी आज पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. ‘पीडीएमसी’चे अधिष्‍ठाता डॉ. ए. टी. देशमुख, डेंटल कॉलेजचे अधिष्‍ठाता डॉ. राजेश गोंधळेकर, आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे आदी उपस्थित होते.

अमरावती महापालिकेच्या डेंटल कॉलेज व पीडीएमसी या रुग्णालयात (शासकीय रुग्णालय स्तर) कोव्हीड 19 लसीकरणाच्या तिस-या टप्प्याला सुरुवात झाली असून याशिवाय प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या 8 खाजगी रुग्णालये / सेंटर याठिकाणी ज्या रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोव्हीड 19 लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन टप्‍प्‍याटप्प्याने या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. शहरात लसीकरण कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी होत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
शासनाच्या निर्देशानुसार पालिकेकडून ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून त्यात 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक, तसेच सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) असणारे 45 ते 59 वर्ष वयाचे नागरिक यांचे लसीकरण होत आहे. 45 ते 59 वर्ष वयाच्या सहव्याधी असणा-या नागरिकांना लस घेण्याकरिता वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांचे संबंधित प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

*सहव्याधी असणा-यांसाठी सूचना*

केंद्र सरकारमार्फत सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) निश्चित करण्यात आल्या असून यामध्ये पल्मनरी आर्टरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट अशा व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आला असून त्याच नमुन्यामध्ये प्रमाणपत्र सादर करणे / अपलोड करणे बंधनकारक आहे.

 

तिस-या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर cowin.gov.in या वेबसाईटवर भरून त्यावरून येणा-या ओटीपी नुसार स्वत:ची नोंदणी करून घेऊन, लसीकरण सत्राची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकतात. त्याचप्रमाणे रिजव्हर्ड स्लॉटमध्ये ज्या लाभार्थ्यांना स्वत:हून नोंदणी करणे शक्य नाही असे लाभार्थी अमरावती महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बुथवर स्वत: जाऊन आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात. यावेळी बुथकरीता निश्चित केलेल्या क्षमतेनुसार लस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली.

*ही कागदपत्रे लागतील*

लसीकरणासाठी 60 वर्षावरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) असणा-या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्राठिकाणी दाखविणे आवश्यक आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक डोस मोफत देण्यात येईल. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालये याठिकाणी लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रति लाभार्थी रुपये 250/- प्रति डोस शुल्क आकारण्यात येईल.

लाभार्थ्याने पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस ते 42 दिवस या अंतराने दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. 42 दिवसांनंतर पोर्टलमार्फत दुसरा डोस घेता येत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.