तातडीच्या उपचारांनी वाचला दोन वर्षांच्या बाळाचा जीव ; राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या पुढाकार

1500

रुग्णकल्याण समितीकडून 32 लाखांची शस्त्रक्रिया विनामूल्य

मुंबई, ता. 3 : अडगाव बुद्रुक येथील दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या दुर्लभ आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी 30 ते 32 लाखांचा खर्च येणार असल्याचे कळताच त्याच्या साधारण परिस्थितीतील कुटुंबावर आभाळ कोसळले. लेकराच्या चिंतेने दु:खी झालेल्या या कुटुंबाच्या हाकेला शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व त्यांचे सहकारी धावून गेले व प्रहार रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून या बाळावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली.

            जिल्ह्यातील अडगाव बुद्रूक येथील योगेश परिमल यांचा सात्विक या दोन वर्षांच्या चिमुकल्याला पोटाचा आजार झाला. सुरुवातीच्या काळात त्याचा फारसा त्रास जाणवला नाही. मात्र, अचानक दुखणे वाढले. त्यामुळे श्री. परिमल यांनी आपल्या बाळाला अमरावतीला आणून डॉक्टरांकडे तपासणी केली. अमरावतीच्या डॉक्टरांनी त्यांना नागपूरच्या डॉक्टरांकडे संदर्भित केले. नागपूरच्या डॉक्टरांकडून सात्विकच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला गाऊचर डिसिज हा आजार असल्याचे निदान झाले.

या आजाराच्या उपचारांसाठी 30 ते 32 लाख रूपयांचा खर्च लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगताच श्री. परिमल यांच्यापुढे संकट उभे राहिले. परिस्थिती साधारण असल्याने एवढे पैसे कसे जमतील, याची चिंता त्यांना पोखरू लागली. त्यानंतर त्यांनी हिंमत बांधून स्वत:ला सावरले व सर्वप्रथम राज्यमंत्री श्री. कडू यांची भेट घेतली व आपली अडचण त्यांना सांगितली.

परिमल कुटुंबाची व्यथा जाणून घेऊन राज्यमंत्री श्री. कडू यांनी त्यांना संपूर्ण मदत तत्काळ करण्याची सूचना आपले सहकारी नीलेश वाटाणे यांना केली. श्री. वाटाणे यांनी परिमल कुटुंबाला तत्काळ मुंबईला जायला सांगितले व मुंबई येथील आपल्या सहका-यांना सात्विकच्या उपचारांसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिमल कुटुंबिय आपले बाळ सात्विकसह मुंबईत पोहोचले. मुंबईत प्रताप तायडे यांनी परिमल कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था केली व तेथील एचआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये अवघ्या एका दिवसात उपचाराला सुरूवात झाली. उपचारानंतर सात्विकची प्रकृती चांगली झाली आहे. उपचारांसाठी आलेला 32 लाखांवरील खर्च रुग्णकल्याण समितीकडून देण्यात आला.

या मदतीमुळे एका गरीब दांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकला. या मदतीने आमच्या लेकराचा जीव वाचू शकला. आम्ही हे कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दांत परिमल कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जाहिरात