जि. प. शिक्षण व बांधकाम सभापतीपदी सुरेश बाबाराव निमकर अविरोध

0
972
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 9 : जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या शिक्षण व बांधकाम सभापतीपदाची निवडणूक आज झाली. शिक्षण व बांधकाम सभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश बाबाराव निमकर यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

जिल्हा परिषदेचे 59 सदस्य असून, सद्य:स्थितीत तीन पदे रिक्त आहेत. उर्वरित 56 सदस्य व पंचायत समितीचे 13 सभापती अशा 69 सदस्यांना आजच्या सभेला आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी 38 जि. प. सदस्य व 4 पं. स. सभापती असे 42 सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमानुसार सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. त्यात मंगरूळ दस्तगीर येथील जि. प. सदस्य सुरेश बाबाराव निमकर यांच्याकडून तीन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. या नामनिर्देशनपत्रांना अनुक्रमे नितीन गोंडाणे, बाळासाहेब हिंगणीकर, विठ्ठल चव्हाण हे सूचक होते. दुपारी तीनला सभेचे कामकाज सुरु होऊन पीठासीन अधिका-यांनी प्राप्त 3 नामनिर्देशनपत्रांनुसार उमेदवाराचे नाव वाचून दाखवले. छाननीअंती तिन्ही नामनिर्देशनपत्रे वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनीटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. ती विहित वेळ संपल्यावर एकाच उमेदवाराचा प्राप्त अर्ज असल्याने जि. प. विषय समिती सभापती क्रमांक तीनपदी सुरेश बाबाराव निमकर हे अविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिका-यांनी जाहीर केले.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवनियुक्त सभापती श्री. निमकर यांचे अभिनंदन केले आहे.

निवडणूककामी पीठासीन अधिकारी श्री. राजपूत यांना नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी सहकार्य केले.

 

000