*मेळघाटातील रानगव्याने रोखली पालकमंत्र्यांची वाट* *मेळघाटात समृद्ध वनजीवनाच्या संवर्धनासह पर्यटनाला चालना* – *पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

290

 

अमरावती, दि. १९ : _सातपुड्याच्या कुशीतील मेळघाट वृक्षसंपदा आणि वन्यजीवनाने समृद्ध आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनाही परवाच्या मेळघाट दौऱ्यात आली. मेळघाटात कार्यरत महिला वन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यास निघालेल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या भेटीला रानगवाही पोहोचला. त्याने चक्क डांबरी रस्त्यावर येऊन पालकमंत्र्यांची वाट रोखली._

गत गुरुवारी चिखलदरा -सेमाडोह मार्गावरून महिला व बालविकास मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना मेमना गेटच्या पुढे अचानक रानगवा रस्त्यावर दाखल झाला आणि ताफ्यापासून सुरक्षित अंतरावर रस्त्याच्या कडेला तो उभा झाला. जणू काही आपण कोरोनाची नियमावली पाळत आहोत, असेच त्याला सुचवायचे होते.

दरम्यान, गाडी का थांबली हे जाणून घेण्याकरिता
मंत्री श्रीमती ठाकूर वाहनातून खाली उतरल्या. तेव्हा त्यांना रानगव्याचे दर्शन झाले.

दौऱ्यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हेही सोबत होते. त्यांनी रानगव्याबाबत माहिती पालकमंत्र्यांना दिली.
बराच वेळेनंतरही रानगवा रोखलेली वाट मोकळी करीत नसल्याचे बघून पालकमंत्र्यांनी त्याला बाय करण्याचा निर्णय घेतला. आणि बायसनच्या बाजूने आपले वाहन हळुवारपणे काढत सेमाडोहच्या दिशेने त्या मार्गस्थ झाल्यात . यात निसर्गानेही हलक्या पावसाच्या सरींनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

मेळघाट हा नितांतसुंदर वनप्रदेश आहे. त्याच्या संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यापुढेही अभिनव उपक्रमांना चालना देण्याचा मनोदय पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

जाहिरात