*_पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करून घेतला मेळघाटातील विकासकामांचा आढावा_* *नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळाव्यात*-

0
899
Google search engine
Google search engine

 

*पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले स्पष्ट आदेश*

 

अमरावती, दि. १९ : मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाची उपलब्धतेसाठी जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील यंत्रणेला दिले. अधिकारी व कर्मचा-यांनी कामात कुठलीही कुचराई न करता नागरिकांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा करून तेथील विकासकामांचा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावोगावच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

मी समृद्ध तर गाव समृद्ध
चिखलदरा तालुक्यातील जेतादेही येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावांत विविध विकासकामे, अंगणवाडी, शाळा सुधारणेच्या कामांना चालना मिळाली आहे. मनरेगाशी विविध विकासकामांची सांगड घालून मी समृद्ध तर गाव समृद्ध राबविण्यात येत आहे. पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत कामांना चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

त्यांनी मोथा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला भेट दिली. स्थानिकांमध्ये हिमोग्लोबिन कमतरतेची समस्या आढळून येत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे निरीक्षण आहे. त्यानुसार आहारासंबंधी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तेथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन त्यांनी कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावातील गरोदर महिला तसेच स्तनदा मातांची देखील भेट घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली व मोथा येथील रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.

चिखलदरा स्कायवॉकमुळे पर्यटनाला चालना मिळेल
चिखलदरा येथे सिडकोव्दारे स्काय वॉकचे काम चालू आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. प्रकल्पामुळे चिखलदऱ्यातील पर्यटनाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी चिखलदरा भेटीवेळी सांगितले. तेथील वन विभागाच्या बागेला भेट देऊन विविध वनस्पती तसेच वन्यजीवांविषयी माहिती घेतली, तसेच त्यांनी स्पायडर म्युझियमलाही भेट दिली व म्युझियमच्या विकासासाठी आवश्यक बाबी मिळवून देण्यात येतील, असेही सांगितले. आमझरी येथील रोपवाटिकेची पाहणीही त्यांनी केली.
*मधुमक्षिकापालन व्यवसायाद्वारे रोजगारनिर्मिती*

शहापूरच्या शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाऊंडेशनव्दारा चालविल्या जात असलेल्या मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहे. या केंद्राव्दारे आदिवासी महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण मिळते. यातून स्थानिक महिलांना चांगला रोजगार मिळण्यासाठी आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया येथे भेट देऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबाच्या अडचणी जाणून घेतल्या. पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना योजनांबाबत, तसेच आवश्यक प्रशासकीय कामांबाबत माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी येत्या काळात निश्चित उचलले जातील, असेही त्यांनी सांगितले. हरिसाल
येथे त्यांनी महिला वनरक्षक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. धारगड वनपरिक्षेत्रातील महिला वनरक्षकांची बैठक घेतली यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच समस्याचे निराकरण करण्याचे निर्देश वनविभागाला दिले.

धारणी तालुक्यातील बारी येथे भेट देऊन पालकमंत्र्यांनी वनविभागाच्या रोपवाटिकेला व औषध व दुर्मीळ प्रजाती संवर्धन केंद्राला भेट देऊन तेथे लागवड केलेल्या औषधी वनस्पतींची माहिती जाणून घेतली. औषधी वनस्पती तसेच दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे याकरीता शासन स्तरावरुन आवश्यक ती सर्व मदत करण्याकरीता कटिबध्द असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

000