*जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत विविध डॉक्टरांची चर्चा ; कुठलाही ताप असो, रुग्णाची आरटीपीसीआर करून घेणे आवश्यक*

0
2996

 

अमरावती, दि. 21 : _रुग्णाला टायफॉईड किंवा कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास उपचार करतानाच रुग्णाची दोन दिवसांत आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी जेणेकरून तो कोरोनाबाधित असल्याचे आढळले तर त्याला वेळीच उपचार मिळून त्याचा जीव वाचेल. अनेकदा उशिरा निदान झाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे कुठल्याही तापाचे निदान करताना रुग्णांची कोरोना चाचणी करुनच घ्यावी. ग्रामीण भागातील डॉक्टर मंडळींनी ही बाब कसोशीने पाळावी, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत मांडण्यात आली._

शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या उपस्थितीत आरोग्य यंत्रणा, इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध मान्यवर डॉक्टर मंडळींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

*उशिरा निदानाने धोका वाढतो*

अनेकदा रुग्णाला ताप आला की टायफॉईड किंवा इतर प्रकारच्या तापाचे निदान होते व तेवढ्यापुरतेच उपचार केले जातात. मात्र, अशावेळी रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्याचा आजार वाढू शकतो. त्यामुळे कुठलीच जोखीम न घेता कुठलाही ताप आला तरी चाचणी करुनच घ्यावी. सध्याचे संक्रमण पाहता प्रत्येक ताप हा कोरोना समजावा, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे डॉक्टरांनी, विशेषत: ग्रामीण भागातील डॉक्टरांनी ही बाब कसोशीने पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य शासनाच्या टास्क फोर्सने याबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे. वैद्यक व्यावसायिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

*ग्रामीण भागातील डॉक्टरांना आवाहन : डॉ. प्रफुल्ल कडू*

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्वांनी सहकार्य गरजेचे आहे. पूर्वी ही साथ शहरी भागात अधिक होती, ती आता दुस-या टप्प्यात ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टर बांधवांनी प्रत्येक ताप म्हणजे कोरोना समजावा. सर्वप्रथम त्याला आयसोलेशनचा सल्ला द्यावा व त्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणीही करून घ्यावी. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरला रुग्णावरील उपचारात ॲजिथ्रोमायसीन, आयवरमॅक्टिन, माँटेल्युकास्ट अशी औषधे वापरता येतील, अशी सूचना डॉ. प्रफुल्ल कडू यांनी केली.

कोरोनाच्या दुस-या लाटेत, एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर अख्खे कुटुंबच पॉझिटिव्ह येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांची चाचणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, इतरांनाही वेळीच औषधोपचार झाला पाहिजे जेणेकरून धोका कमी होईल. या सगळ्या बाबी तपासून त्यानुसार डॉक्टरांनी कार्यवाही करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

*घरगुती उपचारांवर विसंबून राहणे धोक्याचे : डॉ. रोहणकर*

नागरिकांनी हलका ताप आला तरी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणे व चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांवर विसंबून राहू नये. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या काळात वैद्यकीय तपासणी व योग्य उपचारच घ्यावेत, अशी सूचना डॉ. अनिल रोहणकर यांनी केली.

*तालुका आरोग्य अधिका-यांना तत्काळ सूचित करण्याचे आदेश*

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेत पालन होण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिका-यांना सूचित करावे. प्रत्येक ठिकाणी वैद्यक व्यावसायिकांना सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी डीएचओंना दिले.

000