जिल्हाधिकाऱ्यांकडून अचलपूर, चांदूरबाजार ला भेट *कंटेन्मेंट झोनचे निकष काटेकोरपणे पाळावेत* – *जिल्हाधिकारी शैलेश नवाल*

347

 

अमरावती, दि. १ : कंटेन्मेंट झोनबाबत शासनाने दिलेल्या सूचनांनुसार काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल अचलपूर येथे दिले.

ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी काल अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यांना भेट देऊन रुग्णालयांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, नपा अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आवश्यक तिथे तपासण्या व वेळेत उपचाराला गती द्यावी. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. याबाबत आवश्यक ती सामग्री मिळवून देण्यात येईल. गृह विलगिकरणाचे नियम रुग्णांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी संपर्क, देखरेख, समन्वय नियमित ठेवावा.

अचलपूर व चांदुर बाजार शहरातील स्थितीचा आढावाही त्यांनी घेतला व तेथील रुग्णालयानाही भेट दिली. यावेळी त्यांनी काही नागरिकांशी संवाद साधून व्यवस्थेबाबत विचारपूस केली. सावळी दातूरा येथील लसीकरण केंद्राला त्यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
०००

जाहिरात