*खासगी रुग्णालयामधील म्युकरमायकोसिस उपचारांचे दर निश्चित* -जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा आदेश जारी

910

अमरावती, दि. ७ : आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्ह्यात कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे. म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण संपूर्ण महाराष्ट्रात आढळुन येत आहेत. त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे म्युकरमायकोसीस रुग्णांकडून आकारले जाणारे जास्तीत जास्त दर निश्चीतीबाबत अधिसुचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही खासगी रुग्णालयाला कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. या संदर्भाचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.

*म्युकरमायकोसीस रुग्णांकडून आकारले जाणारे निश्चित दर पुढीलप्रमाणे :*

अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील ब वर्ग शहराकीता तसेच मनपा क्षेत्र वगळून संपूर्ण जिल्ह्यासाठी सामान्य वार्डासाठी आयसोलेशन वार्डसह तीन हजार रुपये शुल्क, व्हेंटीलेटर वगळून आयसीयु व आयसोलेशन वार्डसाठी रुपये 5 हजार 500, व्हेंटीलेटरसह आयसीयु व आयसोलेशन वार्डसाठी 6 हजार 700 रुपये शुल्क आकारण्यात यावे. यामध्ये मॉनिटर, सीबीसी, युरीन रुटीन, एचआयव्ही स्पॉट ॲन्टी एचसीव्ही, एचबीएस सीरम क्रेटीनाईन, युएसजी, युएसजी, 2 डी इको, एकस रे, इसीजी, ड्रग्स, ऑक्सीजन चार्जेस, फिजीसिएन कंन्सलटेशन चार्जेस, बेड चार्जेस, नर्सींक चार्जेस, जेवण, रायल्स ट्युब इनसरशन, युरीनरी ट्रॅक्ट कॅशेटरायझेन, ब्लड प्राड्क्टस्, आयव्ही फ्युल्डस् आदी चाचण्या व तपासण्यांचा समावेश असेल.

उपरोक्त दरापेक्षा जास्त आकारणी करणारे व्यवस्थापन किंवा खाजगी हॉस्पीटल्स हे आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, महाराष्ट्र कोवीड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत कार्यवाहीस पात्र राहतील. या बाबतची तपासणी व कार्यवाही सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन अमरावती, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.
०००००

जाहिरात