गुड्डीच्या आईला माहिती आहे पालकमंत्र्यांचे नाव!

0
538

 

कोरोना नियमांना तिलांजली देत आंदोलन

शेगांव:- शेगांवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात दोन दिवस अगोदर महागाई आणि पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलच्या दरम्यान अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या परंतु आंदोलन करतांना आपण सत्तेत असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलेल्या कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे या सर्व सूचनांना ठेंगा दाखवत, कोरोना नियमांची पायमल्ली करीत आंदोलनाचा अट्टाहास पूर्ण केला.

महत्वाचे म्हणजे, पक्ष्याचे कार्यकर्ते ४ चाकी गाडीत तीच्या क्षमतेच्या दुप्पट, मोठ्या संख्येने भरून कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आले होते. मुख्य म्हणजे या आंदोलनासाठी चक्क स्कूल बसचा देखील वापर करण्यात आला. शाळेच्या बसवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा देखील लावण्यात आला होता आणि नेतृत्व कर्त्या नंदाताई पाऊलझगडे यांना त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता “महिलांना आधीच ग्रामीण भागात पैसे कमी मिळतात, त्यांना सहकार्य म्हणून स्कूल बसची मदत त्यांना दिली” असे उत्तर देत, स्कूल बसचा वापर किती सदुपयोगी केला आहे असं पटवून देताना दिसल्या.

तसेच, आंदोलनात सहभागी असलेल्या महिला कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांचे नाव विचारले असता, “मला माहित नाही. गुड्डीच्या आईला माहिती आहे” असे भलतेच उत्तर मिळाले. ज्या कार्यकर्त्यांना आपण कोणाच्या पक्षात आंदोलन करतोय? आपले नेते कोन? याची ही जान्हीव नसावी याला दिव्यच म्हणावे लागेल.

आंदोलन करतांना आंदोलन पक्षाचे होते की एक पक्षाच्या महिलेचे हा प्रश्नच शेगांवकरांना पडला कारण आंदोलनादरम्यान एक ही पक्षाचा मोठ्या कार्यकर्त्याची उपस्थिती नव्हती केवळ जळगांव खान्देशचे माजी आमदार जैन व त्यांचे मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. शेगांवातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते यांनी या आंदोलनाला पाठ फिरवली असे एकंदरीत चित्र दिसले.

आंदोलन होत असताना, या आंदोलनाला जमलेली महिलांची गर्दी जळगाव जामोद, संग्रामपूर परिसरातील आहे, त्या आंदोलन करण्यासाठी शेगांवी का आल्या? बहुदा ती गर्दी स्वतःला प्रसिध्द करण्यासाठी बाहेरून आयात केलेली तर नसावी ना? अशी खमंग चर्चा शेगांवातील नागरिकांमध्ये आहे. ज्या आंदोलनात सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्या महिलांवर व नेतृत्व करणाऱ्या नंदाताई पाऊलझगडे यांच्यावर पोलीस अधिकारी काय कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरेल.