दहावी निकालाची साइट हँग; निकाल लागलाय, पण पाहायला मिळेना

0
1486
Google search engine
Google search engine

दहावीचा निकाल दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी पाहू शकणार, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने कळवले होते. मात्र १ वाजल्यापासून निकालाच्या दोन्ही लिंक उघडत नसल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

 

दहावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. मात्र, निकालाच्या साइटवर ट्रॅफिक वाढल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकालाच्या दोन्ही लिंक पाहत असल्याने या साइट हँग झाल्या असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा निकालासाठी एमकेसीएलच्या दोन्ही वेबसाइट डिसकंटिन्यू केल्या आहेत. निकालासाठी यंदा result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी, पालक निकालासाठी वारंवार या दोन्ही लिंकवर जात आहेत, पण त्या सुरू होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत.