जिल्ह्यात दगड, विळ्याने दोघांची हत्या

0
537
Google search engine
Google search engine

अचलपूर /बडनेरा : रंगपंचमीला दोन घटनांमध्ये जिल्ह्यातील दोघांना ठार करण्यात आले. पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभी वाघोली येथे दगडाने चेचून, तर बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनीनगर येथे विळ्याने मारून युवकाला ठार करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये चौघांना अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, शेतात निघालेल्या श्री रमेश नक्कलसिंग उईके (२८, रा. कुंभी वाघोली) या आदिवासी युवकाला अंकल हिरालाल खळाये (२८) व गणेश हिरालाल खळाये (३२, दोघे रा.कुंभी वाघोली) या भावंडांनी रस्त्यात अडवून फगवा मागितला. रमेशने नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत त्याने पोलीस पाटलाला कळविले. त्याचा राग ठेवून पुन्हा दगडाने मारहाण केली. यात रमेश गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. मृताची पत्नी रोशनी रमेश उईके (२५) हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत दोघा भावंसह अंकलच्या पत्नीला अटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. घटनास्थळाला अंजनगाव सुर्जी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांनी भेट दिली. ठाणेदार सचिन जाधव, जमादार प्रमोद फलके, नरेश धाकडे, प्यारेलाल जवंजाळ, माधव जांबू, हेमंत निखडे, विजय गायकवाड, उघडे आदी पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. फगवा मागण्यासाठी झालेल्या वादातून ही हत्या बहुदा पहिली घटना ठरली आहे.

संजीवनीनगरात युवकाला केले ठार
बडनेरा ठाण्याच्या हद्दीत संजीवनीनगर परिसरात शुक्रवारी रात्री युवकाच्या मानेवर विळ्याने वार करण्यात आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल अमृत काकडे (७२, रा.निंभोरा) असे आरोपीचे नाव आहे. सुनील सरदार मालवे (४०, रा.जनुना, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृताचे नाव आहे. होळीच्या करीनिमित्त हे दोघे जेवणासाठी एका घरी जमले होते. मृताच्या ओरडण्यामुळे नागेश ठाकरे (रा. हिवरा) हा धावत आला तेव्हा विठ्ठल हा सुनीलच्या मानेवर विळ्याने वार करीत होता. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली.