अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीची हत्या – अपहरण केलेली मुलगी सुरक्षित, हत्याप्रकरणी चार आरोपींना अटक ; एएसपी शशिकांत सातव दिवसभर शहरात होते तळ ठोकून 

0
10264
Google search engine
Google search engine
२४ तासांच्या आत हत्येचा उलगडा 
चांदुर रेल्वे :-
एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी नईम खान रहमान खान (वय ३५ वर्ष) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) पहाटे ३ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे शहरातील गारोडीपुरा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. दीपक रतन पवार (वय २८), साजिद उमर उर्फ पप्पू आरिफ शेख (वय ४१), अमजद खान युसूफ खान (वय २७) व मोहम्मद हाफिज मोहम्मद कादर (वय ४२) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहे. २४ तासांच्या आत पोलीसांना घटनेचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केले.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर ला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान आरोपी नईम खान (वय ३५) व इतर तिघे असे एकुण चौघे विना नंबरच्या तवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कूटूंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसवून घेऊन गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांच्या चार पथकांकडून पीडित मुलीचा व आरोपीचा शोध सुरू होता. तसेच मुलीला वापस आणून द्या व आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करा अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली होती. यानंतर शुक्रवारी रात्री २  वाजताच्या दरम्यान मुख्य आरोपी नईम खान व इतर काही साथीदारांनी  पीडित मुलीला तिच्या घराजवळ सोडून निघून गेले होते. यानंतर पुन्हा १ तासाने पहाटे तीन वाजताच्या दरम्यान आरोपी नईम खान हा गारोडीपुरा येथे आला व शस्त्राचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करीत होता. याच दरम्यान चार आरोपींनी कोणत्यातरी धारदार शस्त्राने छातीत वार करून तसेच डोळ्यावर मारून गंभीर जखमी करून जीवाने ठार मारले. या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी नईम खान याला ग्रामीण रुग्णालय येथे नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून फिर्यादी मोईन खान रहमान खान यांच्या तक्रारीवरून हल्लेखोरांविरुद्ध भादंवी कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता व पुढील तपास प्रारंभ केला. चांदूर रेल्वे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती यांनी संयुक्तपणे तपास केला. ही घटना घडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव हे दिवसभर चांदूर रेल्वे तळ ठोकून बसले होते. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवित २४ तासांच्या आत चार आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ श्री. जगदाळे यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी व पोलीस करीत आहे. मृतक नईम खान याच्यावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त पाहावयास मिळाला असून छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभर शहरात एलसीबी पथक, तिवसा, कुऱ्हा, मंगरूळ दस्तगिर, तळेगाव, दत्तापुर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच दंगा पथक तैनात होते.

अपहरण प्रकरणातील दोघे फरार

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एक आरोपी अतुल कुसराम हा अटकेत आहे. मात्र शेख अशफाक (वय ३६) व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे दोघे आरोपी अजूनही फरारीतच आहे. 

मृतकावर अनेक गुन्हे आहे दाखल

मृतक नईम खान याच्यावर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल आहे. यामध्ये खुनासह इतर अनेक गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.