*नववर्षानिमित्त शहरातील काही मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद*

0
339

*अमरावती, दि. 29 :* नववर्षाचे स्वागत निमित्ताने बहुसंख्येने नागरिक विशेषत: तरुण वर्ग आनंदोत्सव साजरा करतात. नागरिक बिअरबार, धाबे, हॉटेल इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करुन रात्रीच्या वेळी रस्त्याने मोटार सायकलवर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसवून वेगाने वाहने चालवितात. अशावेळी वाहन चालवितांना वाहनचालकाचे संतुलन राहत नाही. त्यामुळे बरेचदा अपघात घडण्याची शक्यता असते. यासाठी अमरावती शहरातील काही मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
वाहतुकीची कोंडी होऊन अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दि. 31 डिसेंबर चे रात्री 10 वाजतापासून ते दि. 1 जानेवारी 2023 च्या सकाळी 6 वाजेपर्यंत गाडगेबाबा समाधी ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडियमकडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, तसेच कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी पोलीस उपायुक्त प्रशांत राजे यांनी केले आहे.