कडेगाव तालुक्यातील वांगी येथील अतिक्रमण काढण्याची ग्रामस्थांची मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन : कडेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा*

Google search engine
Google search engine

*

सांगली/कडेगाव न्युज :
सांगली जिल्ह्यातील वांगी (ता.कडेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून खोकी घातली आहेत. सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे. या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोरील रस्त्यावर शुक्रवार दि.२४ मार्च रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा वांगी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हणमंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण करून खोकी घातली आहेत. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे अनेक अपघात घडले आहेत. शाळा जवळ असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करताना अपघाताचा धोका होत आहे. त्यामुळे शाळे जवळील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी व लेखी केली. मात्र अतिक्रमण विरोधी ठोस कारवाई झाली नाही. बांधकाम विभागाने सतत चालढकलपणा केला. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दि.२४ मार्च रोजी सकाळी १२ वाजता कडेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता कार्यालयासमोरील रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहिल असे म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रति कडेगाव तहसीलदार, कडेगाव पोलिस ठाणे व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर अध्यक्ष हणमंतराव मोहिते, कार्याध्यक्ष शंकरराव वावरे, उपाध्यक्ष अॕड‌.अमोल मोहिते, बाळासाहेब वत्रे, जेष्ठ नेते दाजीराम मोहिते, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष भानुदास शिंदे, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, राजेंद्र मोहिते, कृष्णत मोकळे, ऋतुराज देशमुख, अभिजित देशमुख, दिपक कुलकर्णी, विजय देशमुख, संदीप मोहिते, सचिन एडके, अमोल कांबळे, सचिन वत्रे, अभिजित कोळी, चिंतामणी शिर्के, कृष्णत पाटणकर, उमेश जाधव, हणमंत सावंत, विशाल सुतार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.