*उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल* _विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाईन पाहता येईल_

0
164
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल ऑनलाइन पाहता येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

*इथे पाहता येईल निकाल :*
बारावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाने पुढीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळ दिले आहे.
mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, www.tv९marathi.com, http://results.targetpublications.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येईल. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण तसेच निकालाची प्रिंट घेता येणार आहे. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाइन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 22 मे ते 5 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमून्यात, विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025) श्रेणीसुधार/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना 27 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरता येईल. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे राज्य मंडळाने दिली आहे.

0000