आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते अग्निशामक दलाच्या चार सुसज्ज वाहनांचे उद्घाटन
शेगाव :-– उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले, “शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. आजची ही पायरी केवळ एक सुरुवात आहे; भविष्यात आणखी सुसज्ज व्यवस्था उभारण्याचा आमचा मानस आहे.” शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून आता शेगाव शहरवासीयांना आगी वर तात्काळ नियंत्रण करणारी क्षमता शेगाव नगरपालिकेला प्राप्त झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक सुविधा आता आपल्याकडे आहे काळजी करण्याचे कारण नाही असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी नगरपरिषद शेगावला प्राप्त झालेल्या सुसज्ज अग्निशामक चार वाहनांच्या उद्घाटन प्रसंगी केले.
दिनांक 21 जून शनिवार रोजी नगरपालिकेसमोरील गांधी चौक मध्ये आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते अग्निशामक दलाच्या चार नव्या आणि सुसज्ज वाहनांचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, फायर ऑफिसर नागेश रोठे ,भाजप नेते शरद अग्रवाल, पांडुरंग बुच,डॉ. बानोले ,राजेश अग्रवाल, गजानन जंजाळ, पवन महाराज शर्मा, ज्ञानेश्वर साखरे, संदीप काळे, अशोक चांडक, कमलाकर चव्हाण,नितीनशेगोकार ,आकाश नावकार, राहुल पल्हाडे ,मंगेश फूसे, प्रमोद काठोळे ,राजू शेगोकार सह महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या वाहनांमध्ये एक मोठी अग्निशामक गाडी, एक जिप्सी आणि लहान गल्लीबोळांमध्ये सहज जाऊ शकणारी बुलेट फायर वाहन यांचा समावेश आहे.
आपत्ती व्यवस्थापनात मोठी सुधारणा:– डॉ.जयश्री काटकर
या नव्या साधनांमुळे शहरातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला अधिक तत्परतेने आणि परिणामकारकरित्या सामोरे जाणे शक्य होणार असून
“शहरात वारंवार घडणाऱ्या अग्नितांडवाच्या घटना लक्षात घेता ही यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे होते. नव्या वाहनांच्या आगमनामुळे शहराच्या आपत्ती व्यवस्थापनात मोठी सुधारणा होईल.” असा विश्वास या वेळी मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आ. डॉ . कुटे यांनी वाहन स्वतः चालून पाहत नव्या वाहनांची माहिती घेत प्रात्यक्षिक करून पाहिले आणि अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे शेगाव शहराच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे, हे निश्चित.