कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र चिंता
अमरावती प्रतिनिधी :
अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS – PRAN) खात्यांमध्ये ऑगस्ट 2025 च्या वेतनापासून नियमितपणे जमा होणारी रक्कम अद्याप जमा झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व चिंता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नुटा संघटनेचे तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी अमरावती विभागाचे मा. सहसंचालक शिक्षण यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून NPS साठी नियमित कपात होत असतानाही संबंधित PRAN खात्यांमध्ये रक्कम जमा झालेली दिसून येत नाही. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणताही SMS, ई-मेल किंवा ऑनलाइन सूचना कर्मचाऱ्यांना प्राप्त होत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात आपली PRAN खाती बंद झाली आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
या संदर्भात विभागीय स्तरावर दूरध्वनीद्वारे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) ही योजना कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेशी थेट निगडित असल्यामुळे, अशा प्रकारचा विलंब हा कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी नेमक्या कोणत्या आहेत, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली आहे. तसेच ऑगस्ट 2025 पासून थकीत असलेले संपूर्ण NPS योगदान तातडीने संबंधित PRAN खात्यांमध्ये जमा करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांकडून पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.











