धार्मिक …कार्तिक एकादशी.
श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा,
५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे
दर्शन
विदर्भातील पंढरीत भाविकांची मांदियाळी
शेगाव:- श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल.)शेगांवसह श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत कार्तिक एकादशी सोहळा साजरा कार्तिकी एकादशीला श्रींचे मंदिरात ५० हजाराचे वर भाविकांनी श्रींचे समाधी दर्शन घेतले व ३० हजारावर वारकरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर श्री क्षेत्र पंढरपूर शाखेव्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये दशमी, एकादशी व बारस या कालावधीत १ लाख १९ हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला. तसेच वारी निमित्त पंढरपूर शाखेत आलेल्या ७४ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ७० भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक रूग्णालयाचे माध्यमातून ६००० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा अशा ९ राज्यामधील ७७ जिल्ह्यातून आलेल्या २० हजार १७७ गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. अशारितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे. श्री शाखेत भाविकांसाठी भक्तनिवासात निवास व भोजनप्रसादाची व्यवस्था कार्यरत आहे. शिवाय रात्री उशीरा येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा महाप्रसादाचे विनामुल्य वितरण करण्यात येते. तसेच श्री प्रगटदिन, श्रीरामनवमी व श्री पुण्यतिथी उत्सव नित्यनेमाने साजरे करण्यात येतात. त्याचबरोबर आषाढी वारीचे प्रसंगी नवमी, दशमी, एकादशी व बारस असे चार दिवस भाविकांना श्री महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच चातुर्मासात वारकरी परंपरेनूसार चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदिंचे आयोजन केले जात असून चातुर्मासात ५०० विद्यार्थ्यांना दररोज माधुकरीचे वितरण देखील करण्यात येते.
कार्तिक व आषाढी वारीचे वेळेस महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या व नियमांची पूर्तता केलेल्या भजनी दिंड्यांना १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी असे भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत वाङ्मयाचे वितरण करण्यात येते.