बालमजूरी प्रथेविरोधी जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान व मोटरसायकल रॅलीला मोठा प्रतिसाद

73

             अमरावती :-
  जागतिक बालमजूरी विरोधी दिवसानिमित्त राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालमजूरी प्रथेविरोधी जनजागृतीसाठी आयोजित स्वाक्षरी अभियान व मोटरसायकल रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला. विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, स्वयंसेवक, नागरिकांसह महिला स्वयंसेवकांची या रॅलीत मोठी उपस्थिती होती.
इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीची सुरुवात झाली.  जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी,उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी,तहसीलदार गजेंद्र मालठाणे, प्रकल्पाचे समन्वयक प्रवीण येवतीकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी चौकात उभारलेल्या फलकावर सर्वांनी स्वाक्षरी केली.


‘बंद करा, बंद करा- बालमजुरी प्रथा बंद करा’ अशा घोषणा देत रॅली इर्विन चौकातून  राजकमल चौकाकडे निघाली. अग्रभागी चित्ररथ व त्यामागे दुचाकीस्वार स्वयंसेवक असे रॅलीचे स्वरुप होते.  जयस्तंभ चौक-जुना कॉटन मार्केट- विलास नगर- शेगाव नाका-पंचवटी या मार्गाने  इर्विन चौकात परत येऊन तिचा समारोप झाला.