पुरावे मागण्याचा देशद्रोह !

0
2519
पुलवामा येथे पाकिस्तानने केलेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रतिशोधाचा एक भाग म्हणून भारतीय वायूसेनेने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानान घुसून बालाकोट येथील जैश-ए-महंमदचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणी जवळपास ३०० आतंकवादी मारल्याचा दावा करण्यात आला; मात्र त्याविषयी काही राजकारण्यांकडून लगेचच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पूर्वीच्या काळापासून ते अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत देशहिताचा उद्देश समोर ठेवून बुद्धी पणाला लावून राजकारण केले जायचे; पण आता मात्र राजकारण करण्यासाठी देशहित पणाला लावले जात आहे. संकटकाळात जनतेच्या मनात राष्ट्रप्रेमाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या ऐवजी जनतेला भ्रमित करणे हा समाजद्रोह आणि देशद्रोह आहे.
बिनडोकपणाचा कहर 
 काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह भारताच्या हवाई आक्रमणाविषयी ‘मेलेल्या ३०० आतंकवाद्यांची छायाचित्रे दाखवा, तरच आम्ही हा दावा मान्य करू’ असे वक्तव्य केले. याच सूरामध्ये पश्‍चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, आम आदमी पक्षाचे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूर मिसळला. हा पाकिस्तानी सूर देशांतर्गत असणार्‍या शत्रुराष्ट्राच्या हस्तकांना बळ देणारा आहे; पण द्वेषाचे राजकारण करणार्‍यांना त्याची जाणीव आहे कुठे ? काही दिवसांपूर्वी महा‘ठग’बंधनमधील राजकीय पक्षप्रमुखांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली होती. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे राजकारण केले जात आहे’, असे निवेदन केले होते. या निवेदनाची नोंद घेऊन पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि लष्कर यांच्याकडून भारतावर टीका करण्याचा प्रयत्न केला गेला. असाच प्रकार ‘सर्जिकल स्ट्राईक’ंनंतरही करण्यात आला होता. ‘भारताच्या प्रत्युत्तरानंतर वायुसेनेचे अभिनंदन करायचे आणि नंतर २-४ दिवसांतच त्याचे पुरावे मागायचे’, हा मूर्खपणाचा कळस आहे. पुरावे मागणारे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. भारतीय सैन्याचे समर्थन करायचे असेल, तर पुरावे मागू नका आणि पुरावे मागायचे असतील, तर भारतीय सैन्याचे समर्थन करत असल्याचा दिखावा करू नका. जेव्हा शत्रूराष्ट्राचे आक्रमण होते, युद्धजन्य परिस्थिती असते, तेव्हा राजकारण्यांनी समजूतदारपणा दाखवायला हवा; पण असा प्रकार सध्याच्या स्वार्थांध राजकारण्यांकडे नाही.
‘पुरावे दो’ टोळीचा देशद्रोह 
 वास्तविक भारतीय वायुसेनेच्या कामगिरीवर जाहीररित्या संशय व्यक्त करणे आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे, हा देशद्रोहच आहे. पुरावे मागणार्‍या या टोळीने कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानला त्यांच्या हेरगिरीचे कधी पुरावे मागितले नाहीत. पाकिस्तानने भारतीय मासेमार्‍यांना सागरी सीमांचे कथितरित्या उल्लंघन केल्याप्रकरणी डांबून ठेवले होते, त्या वेळी पाकिस्तानला त्यांनी भारतीय मासेमार्‍यांनी पाकिस्तान सीमेत प्रवेश केल्याचे पुरावे कधी मागितले नाही; पण भारतीय सैनिकांच्या शौर्याचे मात्र पुरावे त्यांना हवे आहेत. ही तीच टोळी आहे जी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारला धीर द्यायला आणि त्याचे समर्थन करायला सरसावली होती. जी काश्मिरात सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांकडे मानवतेच्या दृष्टीने पहाण्याचे सल्ले देते. मग भारताचा जयजयकार करणार्‍यांनी या ‘पुरावे दो’ टोळीकडे त्यांच्या देशभक्तीचा पुरावा मागितला, तर थयथयाट कशासाठी ?
 
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.


संपर्क : 7775858387