‘अवनी’ गाय असती तर ?

0
2713
 
यवतमाळ जिल्ह्यात ‘अवनी’ (टी १) या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर त्यावर आता राजकारण रंगू लागले आहे. इतके की, कथित प्राणीप्रेमींनी आवाज उठवल्यावर या वाघिणीच्या मृत्यूच्या विरोधात भारतातील महत्त्वाच्या शहरांसह अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आदी देशांतही मोर्चे निघणार आहेत. वाघिणीला मारतांना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने निर्देशित केलेल्या सर्व कार्यपद्धतींचा अवलंब करण्यात आला होता कि नाही, हे अन्वेषणाअंती समोर येईल; पण इथे प्रश्‍न असा आहे की, जेवढी सहानुभूती आणि प्रेम एका वाघिणीला मिळत आहे, तेवढे गोमातेला का मिळत नाही ? वाघिणीला गोळी घालण्यामागे ‘ग्रामस्थांची सुरक्षितता’ हे एक पटण्याजोगे कारण असूनही प्राणीप्रेमींकडून एवढा टाहो फोडला जातो, तर केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून गोवंशियांची आणि ईदच्या दिवशी शेळ्या-मेंढ्याची सहस्रोंच्या संख्येने कत्तल होत असतांना प्राणीप्रेमी मूक का असतात ? 
 वाघिणीची हत्या झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केला होता. गेली दोन-अडीच वर्षे तेथील ग्रामस्थांना भीतीच्या छायेत जगावे लागत होते. शहरात बसून प्राणीप्रेमाच्या गप्पा करणे सोपे आहे; मात्र एखादे श्‍वापद कधीही जीवघेणे आक्रमण करू शकत असल्याची स्थिती असतांना तेथे रहाणे कठीण आहे. कदाचित् म्हणूनच ग्रामस्थांनी प्राणीप्रेमींना आवाहन केले होते की, नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा ३-४ आठवडे गावांत राहून दाखवा. याचा अर्थ प्राण्यांना मारून टाकावे असा होत नाही; पण जेव्हा प्राण्याचा जीव कि मनुष्याचा जीव महत्त्वाचा, असा प्रश्‍न येतो, तेव्हा साहजिकच मनुष्याच्या जीवाला प्राधान्य दिले जाते. 
आंतरराष्ट्रीय षड्यंत्र !
 हिंदु संस्कृतीच्या दर्शनानुसार तर प्राण्यांमध्येही ईश्‍वराला पाहिले जाते; मात्र या घटनेचे भांडवल करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत आहेत. जलीकट्टू असो, बैलांच्या शर्यती वा नागपंचमी असो ! त्यावर आक्षेप घ्यायला प्राणीप्रेमींच्या संघटना पुढे असतात; मात्र घोड्यांच्या शर्यतीवर त्यांना आक्षेप नसतो ! ‘वाघ वाचवा – सृष्टी वाचवा’ असे नारे देऊन मोर्चे काढणारे ‘गोमातेला वाचवा’, ‘गायरान भूमी वाचवा’, ‘गो-अभयारण्य उभारा’ अशी मागणी करतांना दिसून येत नाहीत, ही खंत आहे. उलट अशी मागणी करणार्‍यांना जातीयवादी म्हणून हिणवले जाते. वास्तविक विदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानमार्गावर, तसेच प्राणीसंग्रहालयांमध्ये, विपरित हवामानामुळे प्राणी दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक देशांमध्ये तर हे किडे-प्राणी हे अन्न म्हणूनही खाल्ले जातात. असे असतांना त्यावर मोर्चे न निघता एकाएकी यवतमाळमधील वाघिणीचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर हाताळला जाण्यामागे भारतद्वेष तर नाही ना, हे पहाणे आवश्यक आहे. याही आधी एका बलात्कार प्रकरणाचे निमित्त करून मध्यंतरी ‘भारत हा देश स्त्रियांसाठी धोकादायक आहे’, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. आताही ‘अवनी’ वाघिणीच्या संदर्भाने तसाच काहीसा प्रकार होत असल्याचा वास येतो. 
 वास्तविक भारतीय संस्कृतीएवढी पर्यावरणपूरक संस्कृती दुसरी कुठली नाही. इथे प्राण्यांना केवळ सजीव म्हणून पाहिले जात नाही, तर प्राण्यांमध्येही देवत्व असल्याची भावना ठेवून काही प्राण्यांची पूजा केली जाते. एवढेच नाही, तर प्राण्यांना हिंदूंच्या देवतांचे वाहन म्हणूनही स्थान आहे. त्यामुळे एखाद्या घटनेच्या निमित्ताने भारताची अपकीर्ती करण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते हाणून पाडायला हवेत. 
–  श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 7775858387