मराठ्यांनो कशासाठी जायचं मुंबई मोर्चाला ? वाचा आणि विचार करा…

0
989
Google search engine
Google search engine

१) आजपर्यंत ५८ ठिकाणी मोर्चे काढले. ते काय गर्दी दाखवायला, शक्तीप्रदर्शन करायला किंवा मौज म्हणुन काढले नव्हते. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या मार्गी लागाव्यात, समाजाला न्याय मिळावा, सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी काढले होते. त्यातल्या किती मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार केला याचा त्यांना जाब विचारण्यासाठी जायचंय…

 

२) स्त्री मग ती कोणत्याही जातीधर्माची असो, तिचा सन्मान करायला राजांनी आपल्याला शिकवलं. मात्र कोपर्डीसारख्याच अनेक बहिणींवर अत्याचार होत असताना प्रत्येक वेळी करणाऱ्यांना शिक्षा द्यायला विलंब का लागतो याचा सरकारला जाब विचारायला जायचंय…

३) शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. शेतकरी संप करुनही शेतकरी कर्जमाफी, हमीभाव का मिळत नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु का होत नाहीत, शेतकऱ्यांची फसवणुक का केली याचा सरकारला जाब विचारायला जायचंय…

४) मराठा समाजाला आरक्षण देताय की जाताय हे सत्ताधाऱ्यांना ठणकावुन विचारायला जायचंय…

५) अट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाच्या विरोधात गैरवापर होऊ नये यासाठी त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात हीच वास्तविक मागणी असताना तिचा विपर्यास करुन मराठा-दलित वादाला फोडणी देणाऱ्या सरकार, मिडीया, तथाकथित नेते, विचारवंत आणि अर्धवट जातीवाद्यांना आपली मागणी ठणकावुन सांगण्यासाठी जायचंय…

६) मुका मोर्चा व्यंगचित्र, फोटो काढुन बाजुला व्हा अशी टिंगल, मोर्चाने आम्हाला काहीच फरक पडला नाही अशी दर्पोक्ती, रडतात साले अशी भाषा वापरुन मराठ्यांना खिजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना इशारा द्यायला जायचंय…

७) मराठ्यांचा आक्रोश पाहुनसुद्धा आंधळ्या, मुक्या, बहिऱ्याचे सोंग घेतलेल्या, मराठा समाज दारात न्याय मागत असताना झोपेचं सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जायचंय…

 

८) अरबी समुद्रात शिवस्मारक बांधणार होते त्याचे काय झाले याचा जाब विचारायला जायचंय…

९) मराठा समाजाच्या युवकांसाठी उच्चशिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास यासाठी “सारथी” संस्था काढणार होते त्याचे काय झाले याचे उत्तर मिळवायला जायचंय…

१०) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित करणार होता त्याचे काय झाले याचा खुलासा मागायला जायचंय…

बांधवांनो, सरकारने मराठा समाजाच्या क्रांती मोर्चांना खुप हलक्यात घेऊन जी चुक केली आहे तिचा दाखवुन देऊया. आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी सहकुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईकांना घेऊन मोर्चात सामील व्हा.

९ ऑगस्ट २०१७ सकाळी ११ वाजता
जिजामाता उद्यान,भायखळा ते आझाद मैदान,मुंबई.

एकच लढाई मुंबईवर चढाई
एक मराठा लाख मराठा.