जिल्हाभरात सातबारासाठी चावडीवाचन सुरु !

0
528
Google search engine
Google search engine
गडचिरोली-
संगणीकृत गाव नमुना क्रमांक (7/12) सातबारा अचूक असण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हयात महसूल विभागातर्फे महत्वाच्या चावडी वाचन मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून या मोहिमेत नागरिकांनी आपल्या सातबाराच्या नोंदी तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले आहे.
सर्वांच्या सातबाराच्या नोंदी अद्ययावत असाव्यात आणि त्यांना ऑनलाईन पध्दतीने सातबारा घेणे शक्य व्हावे यासाठी ही राज्यव्यापी मोहिम आहे. 1 मे ते 15 मे या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महा ई सेवा केंद्र तसेच आपले सरकार केंद्र या ठिकाणांवर नागरिकांना सातबारा ऑनलाईन तपासणी करुन घेण्याचा टप्पा पार पडला. यात फारशा तक्रारी आलेल्या नाहीत. तथापि सर्व काम 100 टक्के अचूक असावे यासाठी ही चावडी वाचन मोहीम आहे.
या मोहिमे अंतर्गत मंगळवार दिनांक 16 मे पासून गावोगावी जाऊन चावडीवाचन सुरु करण्यात आलेले आहे. येत्या 15 जून 2017 पर्यंत हा टप्पा राहणार आहे. यात तलाठी आणि त्यावरील पदाचा एक अधिकारी गावात जाऊन चावडी वाचन करतील. यात हस्तलिखित सात बारा आणि संगणीकृत सातबारा यांचा ताळमेळ बसविण्याचे काम अपेक्षित आहे.
संगणीकृत सात बाराचे वाचन चावडीवर करण्यात येणार आहे. त्यात ज्यांना आक्षेप नोंदवावयाचे आहेत त्यांना ते संबंधित गावच्या तलाठयाकडे नोंदवायचे आहेत. याची नोंद घेऊन गावकऱ्यांनी आपापल्या गावातील चावडीवाचनास हजर रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात 16 जून 2017 ते 15 जुलै 2017 या कालावधीत गाव नमुना 7/12 तसेच गाव नमुना 8 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर अचूक असे गावनमुने प्राप्त करणे सर्वांना शक्य होणार आहे. सर्वांनी यात सहभाग नोंदवून माहिती अचूक बनविण्याच्या या खास मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले आहे.