येरड (बाजार) येथे सव्वा सहा लाखांचा ओला गांजा जप्त  – छत्तीसगड पोलीसांनी एका महिलेला केली अटक

0
926
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड (बाजार) या गावाजवळील बेंबळा नदीच्या धरणाच्या काठावर सव्वा सहा लाखांचा गांजा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तत्पुर्वी छत्तीसगड पोलीसांनी गांजा तस्करीमध्ये एका महिलेला शुक्रवारी सायंकाळी तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुलतानपुरमधुन अटक केली आहे.

प्राप्तमाहिती नुसार, ८ ऑक्टोंबर २०१७ रोजी छत्तीसगड राज्यातील कोंडगाव जिल्ह्यातील फारसगाव पोलिसांना उडिसावरून छत्तीसगड मार्गे दोन झायलो चारचाकी गाडी भरून गांजा तस्करी केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे फारसगाव पोलिसांनी सापळा रचून दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला. यामध्ये एक गाडी चकमा देऊन पसार झाली व एका गाडीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सदर एका गाडीतून एक क्विंटल ५० किलो गांजा अंदाजे किंमत आठ लाख रुपये यासह सहा आरोपींना पकडले. आरोपींनी पोलीसांना दिलेल्या माहितीवरून, चांदूर रेल्वे तालुक्यातील सुलतानपूर येथील महिला राजकन्या विलास मोहिते (वय ३५ वर्षे) हिला शुक्रवार २३ मार्चला सुलतानपूर येथील घरून छत्तीसगड पोलिसांनी सायंकाळी ६ वाजता पकडले. यावेळी घरातुन ४ लाख ७२ हजार १७० रूपयाची रोकड सुध्दा जप्त केली. यानंतर महिला आरोपीला कोर्टात हजर करून फारसगाव पोलीस अधिक माहितीकरीता छत्तीसगड मध्ये घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर कारवाई फारसगाव पोलिस स्टेशनचे पीआय साहू, एसएसआय पितांबर सकार, किरण नेतल व इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईत छत्तीसगड पोलीसांना तळेगाव पोलिस स्टेशनचे पीआय वसंत राठोड, रेखा चव्हान यांची मदत लाभली.

ही कारवाई झाल्यानंतर सुलतानपुरवरून ४ कि. मी. अंतरावरील व चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड बाजार वरून १ कि.मी. अंतरावर असलेल्या बेंबळा नदी धरणाच्या काठावर झुडपामध्ये गांजा तस्कर महिलेला अटक झाल्याच्या केवळ दोन तासानंतर म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ओला गांजा आढळून आल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. ही गुप्त माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळतात ठाणेदार उपाध्याय, धामणगाव रेल्वेचे ठाणेदार लांडे व नायब तहसीलदार सवई यांनी घटनास्थळ गाठून सदर माल ताब्यात घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांनीसुध्दा यावेळी भेट दिली. या गांज्याचे वजन १ क्विंटल २४ किलो ८९० ग्रॅम असून अंदाजे किंमत ६ लाख २४ हजार ६७० रूपये आहे. तळेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम २०, २२ एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तळेगाव पोलिस करीत आहे.

तळेगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

अनेक वर्षांपासुन या परिसरात गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असुन तळेगाव पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. छत्तीसगड पोलीसांच्या कारवाईनंतरच सदर प्रकार पुढे आला आहे. यामुळे तळेगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परंतु आता तरी तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.