महाराष्ट्रदिनी गौतम जवंजाळांचा न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाचा इशारा – घरकुल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

0
1605
Google search engine
Google search engine

अनेक वर्षापासुन गौतम जवंजाळ देत आहे लढा

चांदुर रेल्वे:- ( शहेजाद खान   )

     मानवाच्या अन्न ,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा अाहे. शासनाच्या वतीने सुद्धा या गरजा पूर्ण करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न केले जातात. परंतु चांदुर रेल्वे नगर येथील नगर परिषद मार्फ़त देण्यात आलेले घरकुल गरजुंना न देता ही घरकुले चक्क नगर परिषदेचे माजी नगरसेवक, कर्मचारी व ज्यांना आवश्यकता नाही अशा व्यक्तिंना लाभ झाल्याने शहरातील रहिवासी गौतम अण्णाजी जवंजाळ गेली भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी अनेक वर्षापासुन लढा देत आहे. अधिकाऱ्यांना पुरावे सुध्दा फौजदारी कारवाई होत नसल्यामुळे १ मे ला महाराष्ट्रदिनी थेट स्थानिक न.प. प्रवेशव्दारासमोर आमरण उपोषणाचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रदिनाच्या पुर्वीच मुख्याधिकारी फौजदारी कारवाई साठी तक्रार दाखल करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

            महाराष्ट्रभर गाजलेल्या जळगावच्या मोठ्या घरकुल घोटाळ्या सारखा घरकुल घोटाळा चांदुर रेल्वे नगर परिषदेमध्ये झाल्याचे समजते. सर्वसामान्य नागरीकांऐवजी घरकुलाचा लाभ माजी नगरसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी व ज्या लोकानां घरकुलाची आवश्यकता नसताना एकाच घरी दोन-दोन, तिन-तिन घरकुलाचा लाभ देण्यात आला हाच भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ लढा देत आहे. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषणे सुध्दा केली. पुरावे देऊन सुध्दा कारवाई न झाल्याने जवंजाळ यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रारसुध्दा दाखल केली होती. ३० सप्टेंबर २०१६ ला तत्कालीन मुख्याधिकारी यांनी एक महिण्यात कारवाई चे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन फोल ठरले. त्यानंतर गौतम जवंजाळ यांनी आताचे मुख्याधिकारी यांना पुन्हा पत्र दिले. त्यावरून मुख्याधिकाऱ्यांनी ९ मार्च २०१८ ला गौतम जवंजाळ यांना पत्र देऊन १२ मार्च रोजी चर्चा करण्यासाठी बोलाविले होते. व चर्चा केल्यानंतर १५ दिवसांत कारवाईची शाश्वती दिली होती. परंतु ती ही श्वाश्वती हवेतच विरली. त्यामुळे प्रत्येक अधिकारी वेळ मारूण नेत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे आता गौतम जवंजाळ यांना महाराष्ट्रदिनी उपोषणाला बसल्याशिवाय गत्यंतर राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक नगर परीषद प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला.

     अपहार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अपात्र ज्यांनी नियमांची पायमल्ली करून बनावट व खोट्या दस्ताऐवजाच्या आधारे नियमबाह्य शासनाची फसवणुक करून लाभ मिळवला व शासनाच्या रक्कमेचा अपहार केला, अशा धारकाविरूध्द फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या उपोषणाच्या इशाऱ्याच्या धसक्याने जळगाव घरकुल घोटाळ्याची होणार पुनरावृती शहरात होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज !

     या गंभीर प्रकरणाकडे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी पुर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु आताच्या जिल्हाधिकाऱ्यांकडुन या प्रकरणामध्ये लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लक्ष दिल्यास या प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणामध्ये स्थानिक मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरणार का ? हे सुध्दा पाहणे महत्वाचे ठरेल.